राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसंपर्काचा नवा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:09 AM2019-01-22T01:09:34+5:302019-01-22T01:09:42+5:30
महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चेतून पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची शाळा सोमवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या नव्या अर्बन सेल कमिटीने घेतली.
ठाणे : शहरी भागातील समस्या कोणत्या आहेत, नागरिकांशी कशा पद्धतीने बोलले पाहिजे, महासभेत नगरसेवकांनी आपली भूमिका कशी मांडली पाहिजे, विरोधक म्हणून आपला ठसा कसा उमटवला पाहिजे, या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चेतून पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची शाळा सोमवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या नव्या अर्बन सेल कमिटीने घेतली.
येथील एका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजिली होती. सुरुवातीला नगरसेवकांची शाळा घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. शहरातील नागरी समस्यांसंदर्भात पक्षाची सभागृहात आणि बाहेर कशी भूमिका असावी, यासाठी ही कमिटी राष्टÑवादीने स्थापन केली आहे. तिची पहिलीच बैठक सोमवारी ठाण्यात पार पडली. यावेळी कमिटीच्या अध्यक्षा वंदना चव्हाण आणि उपाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक गटासाठी दोनदोन तासांचा कालावधी दिला होता. या माध्यमातून नगरसेवकांची कामे काय आहेत, त्यांनी सत्ताधारी महासभेत कशा चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव मांडतात आणि त्या चुकीच्या प्रस्तावांना कसा विरोध करणे गरजेचे आहे, याची चर्चा झाली. तसेच चुकीच्या प्रस्तावांबाबत जनतेसमोर जाण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेची असल्याच्या सूचना यावेळी अध्यक्षांनी दिल्या. प्रत्येक कामाची रणनीती ठरली पाहिजे. शहरातील वाहतुकीची समस्या नेमकी कशामुळे झाली आहे, ती सोडवण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात, यासाठी जनतेमध्ये जाऊन त्यांची मते घेणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. शहराच्या डीपीचे काय झाले, नवीन डीपी केव्हा तयार होणार आहे, याचीही माहिती घेऊन त्यानुसार आपला अंजेडा ठरवला पाहिजे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नगरसेवकांनी ती संघटना तळागाळापर्यंत गेले पाहिजे. त्यानंतर, शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाºयांचीही बैठक घेण्यात आली.
यावेळी नगरसेवकांनी आपल्याला येत असलेल्या अडचणी सोडवण्याची विनंती केली. सभागृहात एखाद्या प्रस्तावाला विरोध करत असताना आपल्याच पक्षातील काही मंडळी त्या प्रस्तावाच्या बाजूने कसे उभे राहतात, याची माहितीही काही नगरसेवकांनी यावेळी दिली. त्यामुळे याचासुद्धा पक्षाने विचार करून त्यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले.
असा आहे राष्ट्रवादीच्या उपक्रमाचा फॉर्म
यावेळी नगरसेवक, पदाधिकाºयांना माय सिटी माय अजेंडा अशा आशयाचे फॉर्म देण्यात आले असून यामध्ये आपल्या शहरातील १० मोठ्या समस्या, शहराला यश मिळालेले पाच प्रकल्प, कोणत्या पाच गोष्टी शहरासाठी व्हाव्यात, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पाच कोणते उपाय, नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम वाटत असलेले पाच मार्ग असे प्रश्न त्यात दिले आहेत.