राष्ट्रीय वीरबाला बरफ जगतेय हलाखीचे जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:06 AM2019-01-26T01:06:46+5:302019-01-26T01:06:53+5:30
घनदाट जंगलात बिबट्याच्या जबड्यातून मोठ्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफला २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘राष्ट्रीय वीरबाला शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- सुरेश लोखंडे
ठाणे : घनदाट जंगलात बिबट्याच्या जबड्यातून मोठ्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफला २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘राष्ट्रीय वीरबाला शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. शालेय अभ्यासक्रमात ‘धाडसी हाली’ हा पाठ देऊन देशातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श असलेली हाली सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ती शिधापत्रिकेपासून होती. हालीला दोन महिन्यांपूर्वी शिधापत्रिका मिळाली असून, रेशनिंगच्या अन्नधान्यावर तिची गुजराण सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील रातआंधळे येथे हाली आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. झोपडीत राहणारी हाली अतिशय कष्टी व हलाखीत जगत असल्याचे वास्तव उघड करून लोकमतसह आदिवासींसाठी कार्य करणाºया श्रमजीवी संघटनेने प्रशासनाचे लक्ष केंद्रीत केले. आता तिच्या घरकुलाचे काम नुकतेच सुरू केले आहे. शहापूर येथील मुलींच्या वसतिगृहात झाडलोटचे काम ती ‘कामाठी’ म्हणून रोजंदारीने करीत आहे. प्रशासनाच्या लहगर्जीमुळे हलाखीचे जीवन जगणारी ही राष्टÑीय वीरबाला सध्या तीन मुलांची आई आहे. राष्टÑाने सन्मानित केल्यानंतर तिच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली असती तर त्यांना शिक्षण घेता आले असते. उच्च शिक्षणही घेता आले असते. लहानपणी लग्न झाले नसते, अशी खंत हालीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हालीला दोन मुली आणि एका मुलगा आहे. सहा वर्षांची मोठी मुलगी असलेली हाली रातआंधळे येथे पती राम कुवरे याच्यासह राहते. इयत्ता ४ थीच्या वर्गासाठी मराठीच्या पुस्तकात दहाव्या क्रमांकावर ‘धाडसी हाली’ हा धडा शिकणारे विद्यार्थी हालीला आदर्श मानत आहेत. तानसा अभयारण्यात आदिवासींचे १२ पाडे आहेत. नांदगावजवळील जमनापाडा येथे असताना मोठ्या बहिणीसोबत ती लाकडं आणण्यासाठी जंगलात गेली
होती. यादरम्यान मोठ्या बहिणीवर झडप घालून बिबट्याने तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. जवळ असलेल्या हालीने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगडांचा वर्षाव केला. त्यामुळे भेदरलेल्या बिबट्याने तिच्या बहिणीला सोडून पळ काढला. २०१२ साली ही घटना घडली. बहिणीला वाचवताना बिबट्यालाही जिवंत ठेवल्यामुळे हाली २०१३ मध्ये राष्टÑीय वीरबाला शौर्य पुरस्काराची मानकरी ठरली होती.