मुंब्य्रातील मंदिरात राष्ट्रीय एकात्मतेचे घडले दर्शन; शंकर, मारुतीच्या साक्षीने सोडला रोजा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 01:54 AM2019-06-02T01:54:49+5:302019-06-02T06:29:49+5:30
सर्वधर्मीय नागरिकांनी आपापसांतील मतभेद, जाती, धर्म विसरून एका ठिकाणी येऊन सण, उत्सव साजरे करावेत. एकमेकांमध्ये एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असलेला आदर वाढावा.
कुमार बडदे
मुंब्रा : ‘मजहब नही सिखाता, आपस मै बैर रखना’ या प्रसिद्ध काव्यपंक्तीची प्रचीती शुक्र वारी संध्याकाळी मुंब्य्रातील एका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये आली. या पार्टीत मुस्लिम तसेच हिंदू धर्मीय एकाच टेबलावर बसून रोजा (उपवास) सोडत होते. यामुळे येथे अनोखी राष्ट्रीय एकता तसेच अखंडता नांदत असल्याचे दिसून आले.
सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अत्यंत कडक रोजा (उपवास) पकडतात. यामध्ये पाणीदेखील पीत नाहीत. कालगणनेनुसार निर्धारित करण्यात आलेल्या वेळी सूर्यास्तानंतर उपवास सोडतात. यासाठी रमजान महिना संपतानाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक इफ्तार पार्टीचे आयोजन (उपवास सोडण्यासाठी खाद्यपदार्थांची व्यवस्था) मुस्लिमबहुल परिसरांमध्ये करण्यात येते. याचअंतर्गत मुंब्रा अग्निशमन दलाजवळ असलेल्या मारु ती आणि शंकर मंदिराच्या परिसरात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.
सर्वधर्मीय नागरिकांनी आपापसांतील मतभेद, जाती, धर्म विसरून एका ठिकाणी येऊन सण, उत्सव साजरे करावेत. एकमेकांमध्ये एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असलेला आदर वाढावा. त्यांच्यामध्ये एकमेकांच्या धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने मंदिरात इफ्तारीची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती मंदिरांचे संचालन करणारे गणेश आणि महेश पाटील या बंधूंनी लोकमतला दिली.
सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमझान महिना सुरू आहे. मुस्लिम लोक या महिन्यात रोजा करतात. सूर्यास्तानंतर हा रोजा सोडण्यात येतो. या महिन्याच्या शेवटी यानिमित्त ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम धर्मीयांच्या या आनंदात इतर धर्मीयही सहभागी होतात. मात्र, मुंब्य्रातील मंदिरात झालेल्या इफ्तारीतून राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडले.
सर्वधर्मीय नागरिकांनी आपापसांतील मतभेद, जाती, धर्म विसरून एका ठिकाणी येऊन सण, उत्सव साजरे करावेत. एकमेकांमध्ये एकमेकांच्या जाती-धर्माबद्दल असलेला आदर वाढावा. त्यांच्यामध्ये एकमेकांच्या धर्माबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने मंदिरात इफ्तारीची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा कार्यक्रमांतून लोकांमधील एकमेकांच्या धर्माबाबतचा आदर वाढतो. हा या इफ्तार पार्टीमागचा उद्देश होता. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणण्यासाठी असे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.