वाहतूक विभागासह विविध प्रलंबित खटल्यांसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
By सुरेश लोखंडे | Published: December 4, 2023 04:19 PM2023-12-04T16:19:44+5:302023-12-04T16:20:24+5:30
९ डिसेंबरला अनेक खटले निकाली निघण्याची शक्यता
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जिल्हयातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आदी न्यायालयांसह जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधीकरण, ऋण वसुली न्यायाधीकारण व इतर न्यायालयांमध्ये ९ डिसेंबररोजी "राष्ट्रीय लोकअदालत" चे आयोजन करण्यात आले आहे.
येथील प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे ए. एम. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत या राष्ट्रीय लाेक अदालतीचे आयाेजन करण्यात आले आहे. या लोकअदालतमध्ये ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व मा.न्यायालयांमधील दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, वैवाहिक स्वरूपाची, चेक संबंधीची अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बैंक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक बाय, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत, याशिवाय थकित बिले, थकित कर्ज रक्कम प्रकरणांबाबत दावा दाखल पूर्व प्रकरणे नोंदवून त्यामध्ये लोकअदालत पॅनलच्या सहाय्याने तडजोड करण्याची व तडजोड अंतिम रक्कम भरण्याची सूवर्णसंधी दिली जाणार आहे.
वाहतूक नियमांचं उल्लंघनाची अनेक तडजोडपात्र प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जाणार आहे. त्यासाठी माेठ्या संख्येने सहभागी हाेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिव ईश्वर सूर्यवंशी आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे.