राष्ट्रीय गणित दिन विशेष, गणिताची भीती घालवू पाहणारा गणितमित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:18 AM2019-12-22T01:18:09+5:302019-12-22T01:18:14+5:30
संडे अँकर । सोनावणेंची धडपड। विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीही कार्यशाळा
स्नेहा पावसकर
ठाणे : गणिताचा अभ्यास म्हटला की विद्यार्थीच नाही तर पालकांच्या मनातही विनाकारण भीती निर्माण होते. पण केवळ शालेय अभ्यासक्रमातच नाही तर अगदी दैनंदिन जीवनातही व्यवहारात उपयोगी पडते ते गणित. या गणिताबद्दल विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनातीलही भीती घालवण्यासाठी आणि शिक्षकांनाही गणित अध्यापन अधिक सोपे वाटावे या उद्देशाने गणितमित्र संतोष सोनावणे विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करत आहेत.
काहींना संपूर्ण गुण मिळवून देणारा तर काही मुलांना नापासाचा शेरा मिळवून देणारा विषय म्हणजे गणित. या गणित विषयाबद्दल प्राथमिक वर्गातच मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संतोष यांनी काम करण्याचे ठरवले. सर्वेक्षणाचा आधार घेत त्यांनी मुलांना कठीण वाटणाऱ्या संकल्पना जाणून त्या सोप्या करून सांगितल्या.
विद्यार्थ्यांचा गणिताचा अभ्यास घेताना काहीशी टाळाटाळ करणाºया पालकांमध्येही गणित विषयाबद्दल रूची निर्माण केली. विद्यार्थी आणि पालकांसाठी गेल्या ३-४ वर्षात संतोष यांनी अनेक मोफत कार्यशाळा घेतलेल्या आहेत.
गणित शिक्षण आनंददायी वाटावे यासाठी गणित समजून घेताना... या विषयावर त्यांनी ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शिक्षकांसाठी १०० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याद्वारे ते गणितामधील रितीची समज, संबोध, संकल्पना, तर्काची समज विकसित करणारी रंजक पद्धती प्रत्यक्ष खेळाद्वारे मांडतात. भागाकार संकल्पनेवर आधारीत प्रशिक्षण संच व शिक्षक हस्तपुस्तिका त्यांनी तयार केली आहे. तसेच ‘अपूर्णांकाचा पूर्ण अभ्यास’ या पुस्तकातून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
संतोष हे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून सध्या प्रतिनियुक्तीवर प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथे गणित विषय सहायक म्हणून काम पाहत आहेत.
गणित हा विषय यांत्रिक पद्धतीने आणि परीक्षेत गुण मिळवण्याच्या उद्देशानेच अनेकजण शिकतात. पण मुलांना त्यात आवड निर्माण होणे गरजेचे आहे. कारण जे आपल्याला आवडते ते आपण आनंदाने आणि समजून घेत शिकतो. त्यामुळे गणित विषय प्रत्यक्ष कृतीतून, आनंदाने आणि शिकण्याच्या नैसर्गिक शास्त्राने शिकावा यासाठी मी विविध उपक्रम राबवत आहे, असे संतोष सोनावणे यांनी सांगितले.