‘राष्ट्रवादी’चे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
By admin | Published: February 2, 2017 03:03 AM2017-02-02T03:03:52+5:302017-02-02T03:03:52+5:30
केडीएमसीत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवली
कल्याण : केडीएमसीत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका प्रस्तावित असतानाही आजवर यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी डोंबिवली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.
२७ गावे वगळण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. असे असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधातील कारवाईचा निषेध म्हणून सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर नुकताच मोर्चा काढला होता. त्यात, आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसही आक्रमक झाली आहे. साहित्य संमेलनाला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
हे आंदोलन लोकशाही व शांततेच्या मार्गाने असेल. वाहतुकीस व सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभे राहून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जातील, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पत्र पाठवून परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)