गुरुजी तुम्ही पण, शिक्षक मतदारांचे बँक खाते तपासा... राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By सदानंद नाईक | Published: January 30, 2023 07:50 PM2023-01-30T19:50:15+5:302023-01-30T19:50:40+5:30
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केला आहे.
उल्हासनगर: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला असून त्यांची बँक खाते तपासल्यास घोटाळा उघड होणार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी पक्षाने करून खळबळ उडून दिली. दरम्यान महाविकास आघाडीचे बळीराम पाटील व भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे या दोन्ही उमेदवारांनी न्यूइरा शाळेतील मतदार केंद्राला भेट देऊन निवडणुकीचा आढावा घेतला.
उल्हासनगरातील न्यूईरा शाळेत शिक्षक मतदार निवडणुकीचे मतदान केंद्र होते. केंद्रातून ६८९ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या पंचम कलानी, ओमी कलानी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे, डॉ जयराम लुल्ला, प्रकाश गुरणानी आदींनी मोर्चा सांभाळला होता. तर भाजप शिवसेना शिंदे गटाकडून आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, अरुण अशान, नाना बागुल आदी मतदारांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळीराम पाटील तर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदान केंद्राला भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.
दरम्यान राष्ट्रवादीचे युवानेते कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती, काँग्रेस पक्षाचे नेते डॉ जयराम लुल्ला आदींनी निवडणुकीत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला. शिक्षक मतदारांची बँक खात्यात गेल्या दोन दिवसांत कुठून पैसे आले. हे तपासल्यास वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या पैशाचा उलगडा होणार असल्याचा आरोप निकम यांनी केला. एका मताला ५ हजार दिल्याची चर्चा रंगली असून गुरुजी तुम्हीपण असे म्हणायची वेळ आल्याचेही निकम म्हणाले.