रामदेव बाबाविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
By अजित मांडके | Published: November 26, 2022 05:57 PM2022-11-26T17:57:06+5:302022-11-26T17:58:46+5:30
पोस्टर जाळून निषेध, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महिलांच्या वेशभूषेवरुन अश्लील टिप्पणी करणारे योगगुरु रामदेव बाबा यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे - पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे - पालघर विभागीय अध्यक्षा ॠता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करुन रामदेव बाबांचे पोस्टर्स जाळले.
ठाणे शहरात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रामदेव बाबा यांचे योग शिबिर होते. या योग शिबिरामध्येच रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांच्यासमोरच कपड्यांशिवाय महिला चांगल्या दिसतात, अशा आशयाचे विधान केले होते. या विधानानंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष कार्यालयानजीक रामदेव बाबा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘रामदेव बाबा मुर्दाबाद, रामदेव बाबा हाय -हाय, रामदेव बाबाला अटक झालीच पाहिजे’अशा घोषणा देत रामदेव बाबांच्या पोस्टरला जोपडे मारुन ते जाळले.
यावेळी सुजाता घाग यांनी, रामदेव बाबा यांनी या आधीही अशी काही विधाने केली आहेत. आता तर त्यांनी हद्दच पार केली आहे. रामदेव बाबा यांनी केलेल्या या विधानामुळे समस्त महिला वर्गाच्या मनात लज्जा उत्पन्न झालेली असल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. या आंदोलनात रचना वैद्य, मेहरबानो पटेल, कांता गजमल, माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, अनिता मोटे, शुभांगी खेडेकर, साबिया मेमन, सुवर्णा खिल्लारे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.