राष्ट्रवादी काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदासाठी मोजकेच इच्छुक,निवडीवरून नेत्यांपुढे पेच कायम, सक्षम नेतृत्वाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:02 AM2017-09-09T03:02:48+5:302017-09-09T03:03:03+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सत्तेचा पाळणा अनेक वर्षे हलवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीत जबरदस्त पराभव झाला. बंडखोरीमुळे आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदासाठी सक्षम नेतृत्व मिळेनासे झाले आहे. त्यातही जे मोजकेच इच्छुक असले, तरी कुणाला निवडायचे, यावरून खडाजंगी सुरू आहे.
पालिका स्थापन झाल्यापासून १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ महापौर झाले. शिवाय खासदार, आमदारसुद्धा निवडून आले. २०१२ मध्ये पालिकेत पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आले होते. पण, शहरात राष्ट्रवादी म्हणजे गिल्बर्ट मेन्डोंसा असे समीकरण होते. माजी मंत्री गणेश नाईक गट व मेन्डोंसा गटामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांची नेहमीच कोंडी झाली. त्यातही मेन्डोंसा गट वरचढ होता.
मेन्डोंसा जमीन खरेदीप्रकरणी जेलमध्ये गेले. त्या पडत्या काळात स्थानिक राष्ट्रवादी नगरसेवक, कार्यकर्ते यांना नाईक कुटुंबानेदेखील वाºयावर सोडले. त्यामुळे एकीकडे पक्षातून कुणी वाली नाही आणि दुसरीकडे शहरात भाजपा आमदार नरेंद्र मेहता व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चलती असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला भगदाड पाडले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मेन्डोंसा सर्वच्या सर्व नगरसेवक तसेच आजीमाजी जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा, सेना वा काँग्रेसमध्ये गेले. ज्येष्ठ नगरसेवक आसीफ शेख ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले.
निवडणूक तर लढवायची म्हणून लढवली गेली. ६६ उमेदवार उभे केले, पण बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. इतकी वर्षे पक्ष शहरात सत्तेत असल्याने पक्षाची मते मिळतील, हा अंदाजसुद्धा धुळीस मिळाला.
निवडणुकीत नामुश्की ओढवल्यावर आता जिल्हाध्यक्षपदी कुणाला निवडायचे, अशी चिंता राष्ट्रवादीत पडली आहे. पडत्या काळातदेखील संतोष पेंडुरकर, संतोष गोळे, साजीद पटेल पक्षासोबत राहिले. तर, नाईक यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक प्रकाश दुबोले निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेले खरे. पण, उमेदवारी मिळूनही तेथे पॅनलमध्ये बिनसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. त्याशिवाय, निवडणुकीत काँग्रेसमध्ये गेलेले सुरेश पांढरे आले.