जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:12 AM2017-12-28T03:12:37+5:302017-12-28T03:13:23+5:30
ठाणे/भिवंडी : फेरमतदानामुळे रखडलेल्या शेलार गटाचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.
ठाणे/भिवंडी : फेरमतदानामुळे रखडलेल्या शेलार गटाचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि काँग्रेसची मोट बांधून शिवसेनेला धक्का देण्याची त्यांच्या नेत्यांची तयारी आहे. या स्थितीत निवडणूक काळातील युतीधर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत राहणार की बदलत्या राजकारणातील फायद्यांचा विचार करून भाजपाला साथ देणार त्यावर येथील रंगतदार राजकारणाचे रंग अवलंबून आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५३ जागांपैकी शिवसेनेचे बळ २६ आहे. राष्ट्रवादीचे १०, भाजपाचे १६ (एका पुरस्कृत अपक्षासह) आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. काठावरच्या बहुमतासाठी २७ जागांची आवश्यकता आहे. शेलारची जागा शिवसेनेने जिंकली असती, तर त्यांना राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासली नसती. भाजपापुरस्कृत अपक्षाला फोडण्याची घाई शिवसेनेने केल्याने कोणत्याही क्षणी पुरेसे संख्याबळ पदरी पडले, तर आपली गरज संपेल याची राष्ट्रवादीला पूर्ण कल्पना आहे. पण भाजपाची स्थिती तशी नसल्याने त्यांनी जर वेगवेगळ््या पक्षांची मोट बांधली तर त्यांना ती अखेरपर्यंत टिकवावी लागेल. निवडणुकीपूर्वी ठरल्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३६ होते. पण भाजपा, राष्ट्रवादी, अपक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यास ते संख्याबळ काठावरचे बहुमत देणारे म्हणजे २७ होते. शिवसेना असो की भाजपा त्यांना सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक युतीचा हवाला दिला आहे, तर भाजपाच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे जाहीर केल्याने जोवर अध्यक्ष निवड होत नाही, तोवर वेगवेगळ््या राजकीय समीकरणांची चर्चा रंगत राहील.
शेलार गटात भाजपाचे अरूण तुकाराम भोईर यांना ४,५८३ मते मिळून विजयी झाले. शेलार गणात भाजपाचे अविता यशवंत भोईर यांना १,७३५ मते मिळाली. कोलीवली गणात भाजपाचे गंगाराम गणपत उगले यांना २,९३३ मते मिळाली. निकालानंतर पंचायत समितीत शिवसेना आणि भाजपा यांचे संख्याबळ आता समसमान म्हणजे प्रत्येकी १९ झाले आहे. तेथे सत्तेसाठी शिवसेनेला राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस यांना सोबत घ्यावे लागणार आहे.
>भिवंडीतील पंचायतींवर भाजपाची सत्ता
भिवंडी : आधीची जिल्हा परिषदेतील पीछेहाट पुसून टाकत भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने पुन्हा मुसंडी मारली आहे. तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-श्रमजीवी संघटनेच्या युतीने आठ ठिकाणी विजय मिळविला. शिवसेनेला अवघ्या दोन ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. राहनाळ, केवणी-दिवे, कालवार, काटई आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीतच तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी पहारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आणि ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन केले. त्यातील आठ ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉंंग्रेसवर मात करीत भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. राहनाळमध्ये राजेंद्र मढवी, काटईत नीता सुशील जाधव, कालवारमध्ये देवानंद रामकृष्ण पाटील, वडूनवघरमध्ये सोनम यतीश चौघुले, वज्रेश्वरीत सुनिता भवर, कुसापूरमध्ये शुभांगी पांडुरंग शेलार, चिंचवलीत शांती बुध्या शेलार यांची थेट सरपंचपदी निवड झाली. तर महाळुंगे येथे भाजपा-श्रमजीवी संघटनेच्या जागृती जयवंत भावर यांनी विजय मिळविला. केवणी-दिवे,पायेगाव व भोकरी या तीन ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. या पक्षाव्यतिरिक्त अन्य पक्षांना एकही ग्रामपंचायत मिळाली नाही.
>मुरबाडवर भाजपाचाच झेंडा
मुरबाड : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाने राखलेली आघाडी मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कायम राहिली. मुरबाडजवळील टेंभरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे शरद मार्तंड केंबारी यांची निवड झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दीडशे मतांनी पराभव केला. टेंभरे ग्रामपंचायतीत सात सदस्य आणि सरपंच असे आठ सदस्य निवडून द्यायचे होते. त्यातील सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंचपदासाठी शरद केंबारी व हरिश्चंद्र केंबारी यांच्यात थेट लढत झाली. काचकोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे जानू निरगुडा आणि साजई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे दीपक देसले यांची निवड झाली. या निवडणुकींची मतमोजणी मुरबाड तहसील कार्यालयात झाली.
>शहापूरमध्ये सेनेकडे आठ ग्रामपंचायती
शहापूर : वासिंद, खातिवली, अस्नोली, गेगाव, रानविहिर, फुगाळे, माळ, विहीगाव या शहापूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्याचा तालुका प्रमुख मारु ती धिर्डे यांनी केला आहे. १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीप्रमाणे शिवसेनेने घवघवीत यश मिळवले.
लता कृष्णा शिंगवे (सरपंच वासिंद), आशा रमेश हंबीर (सरपंच खातिवली), भारती पांडुरंग ठोंबरे (सरपंच अस्नोली), पार्वती दादू झुगरे (सरपंच माळ), मथुरा एकनाथ भला (सरपंच फुगाळे), भीमाबाई काळुराम मुकणे (सरपंच गेगाव), अलका शंकर आलगे (सरपंच रानविहीर) व दुर्वास छबू निरगुडे (सरपंच विहीगाव) या आठ ग्रामपंचायतींवर सरपंचपदासह शिवसेनेचा भगवा फडकला.
वासिंद ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची झाली. शिवसेना पुरस्कृत बहुजन विकास आघाडी आणि विरोधात वासिंद जनहक्क विकास आघाडी यांच्यात समोरासमोर लढत झाली. शिवसेना पुरस्कृत बहुजन विकास पॅनेलला नऊ जागा, तर वासिंद जनहक्क विकास आघाडीला आठ जागा मिळाल्या. शिवसेनेविरोधात भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रिपाइं, मनसे असे सर्व एकवटले होते. शिवसेनेच्या लता शिंगवे या सरपंच झाल्या त्यांना ३,६८६, वासिंद जनहक्क विकास आघाडीच्या उमेदवार नलिनी वाटाणे यांना २,५६३ मते मिळाली.