ठाण्यातील पोलिस गणवेश वाटप वादाच्या भोवऱ्यात; NCP च्या आनंद परांजपेंची उपरोधिक टीका
By जितेंद्र कालेकर | Published: February 6, 2023 09:15 PM2023-02-06T21:15:24+5:302023-02-06T21:15:58+5:30
सर्वच लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम व्हावेत
ठाणे : खासदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नौपाडा पोलिसांना केलेले गणवेश वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकारावर उपरोधक टिका करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी गृहमंत्र्यांनाच विनंती करत राज्यभरातील सर्वच आमदार, खासदारांच्या वाढदिवसानिमित्त असे उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गृहखात्याच्या निधीची बचतच होईल, असेही त्यांनी सुनावले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाडा पोलिस ठाण्यात गणवेशाचे वाटप केले होते. वास्तविक गणवेश पुरवण्याची जबाबदारी राज्याच्या गृहखात्याची असून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद असते. इतकेच नव्हे तर गणवेश धुलाईचा भत्ताही पोलिसांना दिला जातो. असे असतांनाही पोलिसांना राजकीय गणवेश चढविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा दोन दिवसांपासून ठाण्याच्या वतुर्ळात सुरू होती. या उपक्रमाला पोलिस उपायुक्तही उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर या सर्व प्रकाराचा समाचार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष परांजपे यांनी घेतला आहे.
हा चांगला उपक्रम आहे, महाराष्ट्राचे पोलिस संचालक रजनीश सेठ यांनी एक परिपत्रक काढावे, की महाराष्ट्रातील सर्वच पोलिसा ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबवावा. अशा उपक्रमांमध्ये डीसीपींनी उपस्थित रहावे, केक कापावा, त्या लोकप्रतिनिधीला भरवावा आणि महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश वाटप त्या लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त व्हावा, असे परांजपे यांनी उपरोधक टीका केली आहे. अशी मुभा सर्वच राजकीय पक्षांना दिली जावी असेही ते म्हणाले. अशा प्रकारचे कार्यक्रम केल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर, विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, त्याचे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांनी गणवेशाच्या साहित्याचे वाटप केले. गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांना अशा साहित्याचे वाटप केले होते. नौपाडा पोलिस ठाण्याला भेट देण्यासाठी गेलो, त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होतो - गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर