राष्ट्रवादीकडून ‘त्या’ पुस्तकाचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:04 PM2020-01-15T23:04:10+5:302020-01-15T23:04:43+5:30
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून, त्यांची तुलना जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी करता येणार नाही.
कल्याण : ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे बुधवारी निषेध करण्यात आला. या पुस्तकाचे सर्वेसर्वा जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणे अत्यंत अशोभनीय व बालिशपणाचे लक्षण आहे. या प्रकाराबाबत गोयल यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असून, त्यांची तुलना जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी करता येणार नाही. भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या तुलना करणाऱ्या पुस्तकाचे झालेले प्रकाशन हा प्रकार अत्यंत निंदनीय, संतापजनक असल्याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, जिल्हा युवा नेते सुभाष गायकवाड, आशीष पाटील, अक्षय पाटील, अनमोल गवळी, यश पितळे, गोरख म्हात्रे या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जय भगवान गोयल यांच्यावर कडक कारवाई व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची दरवेळेस तुलना करून माफी मागणाºया संबंधितांवर कारवाई व्हावी. पुन्हा असे होऊ नये, यासाठी कडक कायदा करावा, यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.