कळव्यातील शिवसेना नगरसेवकावर कारवाईसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:57 PM2018-02-08T19:57:16+5:302018-02-08T20:03:11+5:30

पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेले सेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आघाडी उघडली आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Nationalist Women's Congress demand action against Shivsena corporator | कळव्यातील शिवसेना नगरसेवकावर कारवाईसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

कळव्यातील शिवसेना नगरसेवकावर कारवाईसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

Next
ठळक मुद्देचित्रा वाघ यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेटगणेश कांबळेंवर गंभीर आरोपतडिपार करण्याची मागणी

ठाणे : पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरूद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कारवाई करण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिल्याची माहिती वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गणेश कांबळे हे कळवा परिसरात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. ते कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरात राहतात. गत दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे घरगुती कारणांवरून आपल्याला मारहाण करीत असल्याची तक्रार त्यांची पत्नी कॅरलिन यांनी कळवा पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि विवाह प्रमाणपत्राची मागणी केली. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी बुधवारी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा करिना दयालानी, अ‍ॅड. वंदना जाधव आणि कॅरलिन कांबळे आदी उपस्थित होते.
सरकारी जमिनी हडप करून, त्यावर बेकायदेशीर बांधकामे गणेश कांबळे यांनी केली असल्याचा आरोप वाघ यांनी यावेळी केला. त्याविषयीचे पुरावे पोलीस आयुक्तांना दिले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमि पाहता कांबळे यांना तडिपार करण्याची मागणी केली असल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून, एका गुन्ह्यात कॅरलिना हिनेच त्यांचा जामीन घेतला आहे. आपल्या गैरकृत्यांची माहिती कॅरलिनाला असल्यामुळे तो तिला मारझोड करायचा असा आरोप आरोप वाघ यांनी केला. यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केलेल्या महिला पोलिसांच्या छळाबाबतही आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांचे समुपदेशन करावे, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात गणेश कांबळे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते एका बैठकीमध्ये व्यस्त असल्याची माहिती त्यांच्या सहकार्‍याने दिली.
महिला आयोग आणि गृहखात्यावर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून, रणजित पाटील आणि दीपक केसरकर असे दोन गृहराज्यमंत्री आहेत. राज्यात महिला अत्याचाराचे गुन्हे घडत असताना गृह विभाग दखल घेताना दिसत नाही. मुंबईला खेटून असलेल्या ठाण्यातील या प्रकरणामध्येही तेच पाहायला मिळत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने राज्यात महिला आयोग अस्तित्वात आहे का, असा बोचरा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Nationalist Women's Congress demand action against Shivsena corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.