उद्योग गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन
By सुरेश लोखंडे | Published: September 20, 2022 05:11 PM2022-09-20T17:11:08+5:302022-09-20T17:11:37+5:30
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला.
ठाणे : तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा आरोपासह राज्यातील भाजपा सरकारने राज्यातील वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घशात घातला आदी आरोप करीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर जिल्ह्यातील युवक सकाळी मोठ्यासंख्येने एकत्र येऊन या निदर्शनात सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बाप्पाचा, बंद करा गुजरातची गुलामी, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी, गद्दारांना ५० खोक्के महाराष्ट्राला धोक आदी आशा घोषणांचे फलक घेऊन या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी करून रोजगार वाढीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. यास अनुसरून या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन दिले.
राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय आंदोलनास अनुसरून जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या धरणे आंदोलनात सहभाग घेतला. या युवा कार्यकर्त्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, ठाणे शहर अध्यक्ष विक्रम खामकर आदीनी केले. यावेळी जिल्हह्यातील राष्ट्रवादीचे युवक पदाधिका विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, आणि वॉर्ड अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांसह युवका कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.