ठाणे जिल्ह्याला निसर्ग चक्री वादळाचा चकवा: सकंट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:36 PM2020-06-03T23:36:47+5:302020-06-03T23:56:09+5:30
ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली. नवी मुंबईपासून सुरुवात झालेल्या या वादळाने जिल्हाभर दोन ते तीन तासांची हजेरी लावली. या काळात ठाणे शहरासह भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी भागांमध्ये ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर १० ते १२ घरांचे नुकसान झाले. या वादळापासून बचाव होण्यासाठी खाडी तसेच नदीकिनारी असलेल्या तीन हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले असतांना पावसानेही जिल्हाभर हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. तर ठाणे शहरासह जिल्हयात ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या वादळामुळे कोणतीही मोठी हानी झाली नसून जिल्हयावरचे संकट टळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास या निसर्ग वादळाची नवी मुंबईतून सुरुवात झाली. नंतर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोडया फार प्रमाणात त्याचा आसर जाणवला. वादळी वाºयामुळं नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी वाºयामुळे समुद्रकिनारी असलेल्या घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी भरले होते. ठाण्यातील कळवा भागातही नवशक्तीचाळीत पाणी साचले होते. शहापूरातील दरहिगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचेही नुकसान झाले.
* खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सर्व ग्रामविस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे महापालिकेनेही एनडीआरफची एक टीम तैनात ठेवली होती.
* शिवाय, खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. सुदैवाने या वादळामुळं कोणतीही मोठी हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
* निसर्ग चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळामुळे प्रभावित झालेल्या ठिकठिकाणच्या परिस्थितीची शिंदे यांनी माहिती घेतली. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी देखील त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. वादळाचा प्रभाव ओसरत असून ठाणे जिल्हावासीयांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
* जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन अशी सहा पथके जिल्हयातील मीरा भार्इंदर, शहापूर आणि नवी मुंबईत तैनात केली होती.