‘निसर्ग’चा ३४ शाळांना तडाखा, शिक्षण विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:51 AM2020-06-10T00:51:19+5:302020-06-10T00:51:59+5:30

ठाणे जिल्ह्यात ३४ लाखांहून अधिक नुकसान : शिक्षण विभागाची माहिती

Nature strikes 34 schools in thane | ‘निसर्ग’चा ३४ शाळांना तडाखा, शिक्षण विभागाची माहिती

‘निसर्ग’चा ३४ शाळांना तडाखा, शिक्षण विभागाची माहिती

googlenewsNext

स्नेहा पावसकर ।
ठाणे : गेल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह ठाणे, मुंबईलाही बसला. त्याच्या तडाख्यात ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांचे मिळून एकूण ३२ लाख २५ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून याची माहिती पुढे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाला दिली गेली आहे.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई- ठाण्याला चकवा देऊन पुढे निघून गेले असले तरी त्यामुळे निर्माण झालेल्या वारा, पावसाने मात्र ठाणे-मुंबईत काहीसे नुकसान केलेच. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर अशा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अशा प्रकारचे नुकसान अधिक झाले. घराबरोबरच ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ३१ आणि खाजगी माध्यमिक ३ शाळांचे या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. यातील ३१ शाळा या प्राथमिक विभागाच्या तर ३ शाळा या माध्यमिकच्या आहेत.
३१ पैकी सर्वाधिक १३ शाळा मुरबाड तालुक्यातील, ७ शाळा भिवंडीतील, ५ शहापूर तालुक्यातील, ४ अंबरनाथ तालुक्यातील तर २ कल्याणमधील आहेत. या शाळांपैकी काही शाळांचे वर्गखोल्यांचे छत उडाले आहे. काही शाळांच्या संरक्षक भिंती अर्ध्या कोसळल्या, काहींच्या वर्गखोल्यांची कौले फुटून वासे तुटले आहेत.
काही शाळांच्या गेटची मोडतोड झाली, पाण्याचे पाइप तुटले तर काहींच्या शौचालय, स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. या ३१ शाळांचे मिळून सुमारे ३१ लाख आठ हजार ४०० रुपये इतके नुकसान झाले आहे, अशी माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. तर माध्यमिक विभागातील मुरबाड तालुक्यातील तळवली येथील एका शाळेचे, तसेच शहापूरमधील आणि ठाण्यातील प्रत्येकी एका शाळेचे मिळून एक लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या तरी शाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
मात्र, शाळा सुरू होईपर्यंत नुकसानग्रस्त शाळांचे काम झाले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे पालकवर्गाचे मत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.

निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ही माहिती आम्ही पुढे शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही पाठविली आहे.
- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, ठाणे जिल्हा परिषद

Web Title: Nature strikes 34 schools in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे