जागतिक आदिवासी दिन: एकतेचा धागा मनाशी घट्ट गुंफलेला निसर्गपूजकसमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:29 AM2020-08-09T00:29:57+5:302020-08-09T00:30:00+5:30

कोरोनाच्या धोक्यामुळे कार्यक्रमांचा उत्साह नाही

Nature-worshiping society, the thread of unity is tightly intertwined with the mind | जागतिक आदिवासी दिन: एकतेचा धागा मनाशी घट्ट गुंफलेला निसर्गपूजकसमाज

जागतिक आदिवासी दिन: एकतेचा धागा मनाशी घट्ट गुंफलेला निसर्गपूजकसमाज

Next

- अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : आज ९ आॅगस्ट ‘जागतिक आदिवासी दिन.’ आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणे-घेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. आदिवासीबहुल पालघर जिल्हा निर्मितीपासून या जिल्ह्यात ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, मात्र या वेळी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, एकत्र साजरा करण्याला बंधन आहे. त्यामुळे एकतेचा धागा मनाशी घट्ट करून घरात सुरक्षित राहून प्रत्येकाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यावर भर दिला जात आहे.

आदिवासी हे काटक शरीरयष्टीचे असतात, निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे जीवनचक्र गुंफलेले असल्याने त्यांच्यामध्ये लढाऊपणा ओतप्रोत भरलेली असतो. कोविड-१९ या महामारीने संपूर्ण जग व्यापलेले असताना, आदिवासीही त्या संसर्गापासून सुटलेला नाही. मात्र अंगभूत प्रतिकारशक्तीच्या जोरार त्यांनी त्याच्यावर मात केलेली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिला कोरोना रुग्ण आढळला, तो म्हणजे डहाणू तालुक्यातील गंजाड गावच्या कातकरी पाड्यावरील तीन वर्षीय मुलगी. तिला कोरोनाची बाधा झाल्याने, या छोट्याशा जीवाचे कसे होणार? म्हणून अनेक जण हळहळले. मात्र तिने उपचाराला साथ देत, ती आजारातून पूर्णपणे बरी झाली. तिला संघर्ष करण्याच्या मिळालेल्या वारशाची ती एक झलक होती.

या महामारीने शिक्षण, व्यवसायावर घाला घातला. त्यामध्ये खालच्या उत्पन्न श्रेणीतील आदिवासी मजूरवर्ग होता. नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर काम नसल्याने जिल्हा आणि परजिल्ह्यात स्थलांतर करणारे असंख्य आदिवासी बांधव रिकाम्या हाताने घराकडे परतले. गुजरात राज्यातील औद्योगिक क्षेत्रात रोजगारासाठी स्थलांतरित झालेली शेकडो आदिवासी कुटुंबे बायका-पोरांसह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वरून चालत येत होती. त्यापैकी काहींनी मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर अपलोड करून मदत मागितली. या आवाहनाला आदिवासी संघटना, समाजसेवक आणि शासन मदतीला धावून आले. त्या प्रत्येक कुटुंबाला वाहनातून पाड्यावरच्या घरापर्यंत सोडण्यात आले. ही समाजाप्रती असलेली बांधिलकी आदिवासी बांधव जपताना दिसतो आहे. तर गुजरात येथील मासेमारी बंदरांत अडकलेल्या सुमारे १२ हजार आदिवासी खलाशांना स्व:जिल्ह्यात परत आणण्यात सर्वच स्तरातून योगदान मिळाले.

आदिवासींमध्ये कमालीची एकीची भावना आहे. स्वत:प्रमाणेच इतरांनाही शिक्षण मिळावे, याकरिता शिक्षितांनी ज्ञानज्योत त्यांच्या बांधवांमध्ये तेवत ठेवल्याने या समाजातील अशिक्षितांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. आदिवासी विकास विभागाच्या डहाणू प्रकल्पाअंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई या तालुक्यात ३४ शासकीय आश्रमशाळेत १६ हजार विद्यार्थी, २१ अनुदानित आश्रमशाळेत १३ हजार विद्यार्थी तर १७ शासकीय वसतिगृहात दीड हजार विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवार शाळा बंद आहेत, मात्र ‘स्नेह सेतू’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी-पालकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना जेवण, आजारपण याबाबत चौकशी केली जाते, तर विद्यार्थ्यांना धान्य वाटप केले आहे.

सध्या रोजगार संधींची उपलब्धता खूपच कमी
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्यातील विविध भागांतून या जिल्ह्यात नोकरीनिमित्त आलेल्या ५३४ आदिवासी मजुरांना डहाणू, पालघर, बोईसर, वसई, विरार येथून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या २२ बसेसद्वारे भंडारा, गडचिरोली, धुळे अशा स्व:जिल्ह्यात पाठविण्यात आले.

विशेषत: कातकरी समाजातील आदिवासींकडे शेतजमिनी नसल्याने त्यांच्या घरी साठवलेले धान्य नसते. त्यामुळे रेशनिंगच्या धान्यावर त्यांची भिस्त अवलंबून असते. सरकारने धान्य दिले, मात्र तेल, चहा पावडर, साखर, अंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण या संसारोपयोगी वस्तूंचा तुटवडा त्यांना भासत होता.

आदिवासींच्या गाठीला पुरेसा पैसा नसल्याने धान्य वगैरे विकतही घेता येत नव्हते. ही बांधवांची गरज पूर्ण करण्यास अनेक दाते पुढे आले. दरम्यान, अनलॉकच्या तिसºया टप्प्याला प्रारंभ झाला असून पावसाळा असल्याने शेती, गृहबांधणी, वीटभट्टी हे व्यवसाय बंद असल्याने रोजगार संधीची उपलब्धता खूपच कमी आहे. मात्र, लवकरच हे पर्याय खुले होणार असल्याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे.

Web Title: Nature-worshiping society, the thread of unity is tightly intertwined with the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.