ठाण्यातील मराठा मोर्चा आंदोलनप्रकरणी नौपाडा पोलिसांनीही केली २५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:12 PM2018-08-02T21:12:10+5:302018-08-02T21:16:41+5:30
मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या आंदोलकांनी तीन पोलसी वाहनांसह ३० वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या दंगलीप्रककरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या २५ जणांना आता नौपाडा पोलिसांनीही न्यायालयातून अटक केली आहे.
ठाणे : ठाण्यात झालेल्या मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी पोलिसांवरील हल्ल्यासह दगडफेक केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या दारा चौहान याच्यासह २५ जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्यांची शुक्रवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
नितीन कंपनी येथे २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको केल्यानंतर अचानक हिंसक झालेल्या जमावाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ, उपनिरीक्षक तायडे, हवालदार सुनील शेलार आणि मिलिंद जोशी यांच्यावर दगडफेक केली होती. यात हे चौघेही जखमी झाले, तर काहींनी सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि वरिष्ठ निरीक्षक अफजल पठाण यांच्याही सरकारी वाहनावर दगडफेक केली. याप्रकरणी सुमारे ३०० ते ३५० जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यापैकी दारा विक्रमादित्य चौहान, अंगत लालचंद चौहान, तेजस रेणोसे, सुनील पाटील, शिवाजी कदम, निखिल, अक्षय आंबेरकर, दीपेश बनके, राहुल चौहान, रमण लाड, राजेश बागवे, विश्वास चव्हाण आणि किरण मोरे आदी २५ जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी २६ जुलै रोजी अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नितीन कंपनीच्या परिसरातही याच आंदोलकांनी धुमाकूळ घातल्याचे तपासात उघड झाले. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यासह तीन अधिकारी आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांच्या वाहनांसह १५ ते २० वाहनांवर दगडफेक झाली होती. पोलिसांनी त्यांना या गुन्ह्यातही अटक करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार, त्यांना ३० जुलै रोजी ठाणे न्यायालयातून पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयाने या सर्व २५ आरोपींना ३१ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.