नौपाडा प्रभाग समितीत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:25 AM2019-08-30T00:25:52+5:302019-08-30T00:26:00+5:30
अधिकाऱ्यांना फैलावर धरल्याचा मुद्दा : संखे- रेपाळे आमनेसामने
ठाणे : शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये आपसात सुरू असलेले वाद अद्याप शमले नसल्याचे दिसत आहे. वागळे इस्टेट भागातील प्रभाग क्र मांक १९ मधील शिवसेनेच्या नगरसेवकांमधील वाद पुन्हा एकदा प्रभाग समितीच्या बैठकीत उफाळून आल्याचे दिसून आले आहे. या प्रभागातील दोन नगरसेवकांमध्ये बैठकीत वाद झाले असून एकाने सभात्याग केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १९ मधील शिवसेना नगरसेविका मीनल संखे, नम्रता फाटक विरु द्ध नगरसेवक विकास रेपाळे असा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रभागामध्येच त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर, नुकत्याच झालेल्या महासभेतसुद्धा अशाच पद्धतीने रेपाळे यांना दाबण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्यातील वाद अद्याप मिटले नसल्याचे प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. गुरुवारी झालेल्या या बैठकीमध्ये कोपरी भागातील पाणपोईच्या विषयावर चर्चा सुरू होती. ती उभारताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करून शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर प्रभाग क्र मांक १९ मध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीशिवाय रस्त्यावर उभारलेल्या गतिरोधकाचा मुद्दा उपस्थित करून शिवसेना नगरसेविका मीनल संखे यांनी प्रशासनाला जाब विचारला.
या विषयावरील चर्चेदरम्यान नगरसेविका संखे आणि शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरसेविका संखे यांनी एका अधिकाºयाला अपशब्द वापरले आणि त्यास आक्षेप घेऊन सभात्याग केल्याचा दावा नगरसेवक रेपाळे यांनी केला. संखे यांनी हा आरोप फेटाळला आहे.