ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती
By अजित मांडके | Published: October 13, 2023 01:51 PM2023-10-13T13:51:51+5:302023-10-13T13:52:37+5:30
ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे.
ठाणे : जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेल्या ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात जन्मभूमी श्रीराम मंदिर (अयोध्या) लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गदुर्गेश्वरीचा दरबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्रोत्सव जगातील अनेक देशात प्रसिध्द आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत त्याच उत्साहात सुरू ठेवली आहे. टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी तसेच येथील देखावा पाहण्यासाठी अनेक राज्यातील देवीभक्त दरवर्षी येत असतात. भव्य दिव्य आरास हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य. यावर्षी श्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळया, ऑईल पेंट आदि सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे.
या मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे ३५० कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. प्रामुख्याने यामधील काम हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार व कलकत्ता येथील आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा ४० x ४० फुट इतक्या मोजमापाचा असून, त्याची उंची फुट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विद्रुमाऊली व श्री सत्यनारायणाचे भाविकांना दर्शन होणार आहे. सभा मंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्प कलेची ओळख पटवून देणारी असेल असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
यामध्ये संपूर्ण कारविंग असलेले ४० x ६० फुटाचे छत असून, एकूण ३२ छोटे-मोठे कोरीव खाय या मंदिराचा डोलारा उलघून धरणार आहेत. तर ६४ कोरीव कमानी एकंदरीत गाभाऱ्याची व सभामंडपाची आकर्षक मुर्त्यासह मंडपाची शोभा वाढविणार आहेत. माँ दुर्गेचे मखर पूर्णपणे कित असून, त्याची उंची १८ फुट तर १४ फुट लाबी व १० फुट रुंद आहे. मंदिराची शोमा वाढविण्यासाठी नक्षीकाम असलेल्या कार्पेट सोबतच झुंबर व आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. बाहेरील बाजूस ६ फुटी उंचीचे दोन गरुड स्वागतासाठी उभे असतील तर सात छोटे-मोठे कळस एक मुख्य कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत १० फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील. बाहेरील रोडवरील मुख्य कमानी वानरसेनेचे दर्शन घडविणारे असल्यामुळे आपण श्रीरामांच्य नगरीत असल्याची निश्चितच अनुभूती भाविकांनी निश्चितच होईल असेही खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरु केलेली नवरात्रौत्सवाची परंपरा अव्याहत चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक अगदी हिरहिरीने काम करीत आहेत. दरवर्षी या उत्सवाची शोभा अधिकाधिक वाढत असून, निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे तसेच ठाणेकरांची साथ आम्हाला मिळत आहे. सर्वांनी या नवरात्रौत्सवात सहभागी होवून या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर पत्रकार परिषदेस जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष उत्तम सोलंकी, भालचंद्र घुले, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण, अनिल सोनावणे, संतोष घुले, संजय रवळेकर आदी उपस्थित होते.