नवघरची दफनभूमी शिवसेना, मनसेच्या विरोधानंतर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:18 AM2018-09-25T03:18:01+5:302018-09-25T03:18:23+5:30
महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली.
मीरा रोड - महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. आयुक्तांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा शोधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आ. प्रताप सरनाईक यांनी मोर्चा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, सोमवारी मनसेनेही आयुक्तांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.
सत्ताधारी भाजपाने महासभेत बहुमताने ठराव करून नवघर गावामागील जमीन दफनभूमीकरिता बोहरा, सुन्नी समाजांना देण्याचे ठराव केले होते. पण, स्थानिकांनी तसेच नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे. आयुक्त खतगावकर यांनी ग्रामस्थ व बोहरा समाजाची मंगळवारी बैठक बोलावली असल्याचे कळताच आ. सरनाईक यांनी आयुक्तांना पत्र देऊन सदर जागा कांदळवन, पाणथळ व सीआरझेड-१ ची असून स्थानिकांना मासेमारीसाठी दिली आहे. त्यामुळे पालिकेने केलेला कचऱ्याचा भराव काढून टाकण्याची मागणी केली. सत्ताधारी भाजपाकडून मतांसाठी नाहक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप करत सोमवारी शिवसेनेने सोमवारी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत ग्रामस्थ, आ. सरनाईक, विरोधी पक्षनेते राजू भोईर, माजी उपनगराध्यक्ष अरु ण कदम, स्थानिक नगरसेवक प्रवीण पाटील, वंदना पाटील, संध्या पाटील, अनंत शिर्के आदी उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, नवघरच्या नागरिकांनी सेनेच्या नगरसेवकांना निवडून दिले म्हणून हेतुत: हा प्रकार केला जात आहे. पण, आयुक्त खतगावकर यांनी दफनभूमीसाठी वेगळी जागा शोधण्याचे निर्देश दिले असल्याने मोर्चा स्थगित करत आहे.
कांदळवन लावा, मासेमारीसाठी जमीन द्या
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोमवारी महापालिका आयुक्त खतगावकर यांची भेट घेतली. यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे मनसैनिक व काही ग्रामस्थही उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दफनभूमी होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांच्या भेटीनंतर घेतली असून पालिकेने नाहक भाजपाच्या दबावाखाली धार्मिक तेढ निर्माण करू नये, असा इशारा दिला. कचरा व मातीचा टाकलेला भराव काढून तेथे पुन्हा कांदळवन लावावे आणि मासेमारीकरिता जमीन स्थानिकांना द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.