नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 06:28 AM2018-09-21T06:28:33+5:302018-09-21T06:28:38+5:30

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे.

Navi Mumbai-Mumbai Navigation Road Traffic Distance | नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक मार्गातील अडथळा दूर

Next

- नारायण जाधव 
ठाणे : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई शहराला जलद गतीने जोडण्यासाठी मेरिटाइम बोर्ड, एमएमआरडीए, सिडको व राज्य सरकारद्वारे युद्धपातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. यात मेट्रोसह सीएसटी ते पनवेल उन्नत उपनगरीय मार्गासह जलवाहतुकीचा समावेश आहे. यात जलवाहतुकीच्या मार्गात असलेला खारफुटीचा मुख्य अडथळा आता दूर झाला आहे. कारण, करावे आणि शहाबाज येथील सुमारे ०.४६ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यास राज्याच्या महसूल आणि वनखात्याने मान्यता दिली आहे. यामुळे आता केवळ कांदळवन कक्षाची परवानगी मिळताच नेरूळ आणि बेलापूर येथे जेट्टी बांधण्याचा सिडको आणि मेरिटाइम बोर्डाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महसूल आणि वनखात्याने ठाणे जिल्ह्यातील करावे येथील सर्व्हे क्रमांक २६१ अ व ३०६ वरील राखीव वनांची ०.४४ हेक्टर आणि शहाबाज येथील सर्व्हे क्रमांक ५०० वरील कांदळवनाची ०.०२ हेक्टर जमीन सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे जेट्टी बांधण्यासाठी वळती केली आहे. यानुसार, प्रकल्प यंत्रणा अर्थात सिडको आणि मेरिटाइम बोर्डाने नागपूर येथील अपर प्रधान वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रातील अटी व शर्तींचे पालन करून जेट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात करायची आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि भारत सरकारच्या २५ सप्टेंबर २०१७ आणि १३ फेबु्रवारी २०१८ च्या पत्रातील नियमांनुसार ते करावे, कांदळवन कक्षाच्या प्रमुखांनी त्यांची खात्री करावी, असेही अपर मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आपल्या पत्रात सिडकोस बजावले आहे.
>सिडकोचा सुटकेचा नि:श्वास
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडायचे की, सायन-पनवेल हायवेचे रुंदीकरण करून जलद वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका,
न्हावा-शिवडी सी-लिंकची उभारणी करून लवकरात लवकर
प्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्याचे उपाय शोधले असताना
सर्वांत स्वस्त, कमी खर्चीक व जलद असा हा जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे.
सध्या नवी मुंबई ते मुंबईदरम्यान असलेली रस्तेवाहतूक दिवसेंदिवस तापदायक ठरत आहे. रेल्वेवरही ताण पडत आहे. परंतु आज-उद्या सुरू होणार, असे म्हणत गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया दरम्यानची जलवाहतूक कधी सुरू होणार, असा प्रश्न सिडकोस पडला होता. परंतु, आता खारफुटीची जमीन मिळाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Web Title: Navi Mumbai-Mumbai Navigation Road Traffic Distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.