अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:44 AM2019-11-16T05:44:24+5:302019-11-16T05:44:28+5:30
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील गुलजार अल्लावक्ष पाशा (२४) याला ठाणे गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली.
ठाणे : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या नवी मुंबईतील गुलजार अल्लावक्ष पाशा (२४) याला ठाणे गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून मेथएम्फाटामाइन नावाच्या अमली पदार्थाच्या १२८ गोळ्या हस्तगत केल्या असून त्यांची किंमत तीन लाख २० हजार रुपये इतकी असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी शहरात गस्त करताना गुरुवारी सायंकाळी राबोडीत जाणाºया सर्कलजवळ एक तरुण मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी या पथकाने त्यास हटकले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने तो नवी मुंबई, कोपरखैरणे रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत राहत असल्याचे सांगितले.
याचदरम्यान त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे गुलाबी व नारंगी रंगांच्या एकूण १२८ मेथएम्फाटामाइन या अमली पदार्थाच्या गोळ्या मिळून आल्या. आणखी सखोल चौकशी केल्यावर त्याने त्या गोळ्या पार्टी ड्रग्जकरिता विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच त्या गोळ्यांसह मोटारसायकल व इतर मुद्देमाल असा तीन लाख ७० हजार ८०० रुपयांचा एकूण ऐवज
जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ व औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ८ (क) २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने केली.