नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:22 AM2020-05-29T01:22:23+5:302020-05-29T06:33:37+5:30
कोरोनामुळे संधी आली चालून, बदल होण्यास लागेल थोडासा वेळ
- मुरलीधर भवार
कल्याण : परप्रांतीयांचे लोंढे थांबवा, ही भूमिका मनसेने सुरुवातीपासून घेतली आहे. आता कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय स्वत:हून गावी निघून गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. मराठी माणूस या रिक्त झालेल्या जागा नक्कीच भरून काढणार, यात काही दुमत नाही. त्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे. लॉकडाउननंतर महाराष्ट्राचे नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती असेल, असा ठाम विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार व नेते राजू पाटील यांनी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आहे.
लॉकडाउनच्या काळात लाखोंच्या संख्येने मूळ गावी गेलेल्या परप्रांतीयांची मराठी माणूस जागा घेईल का, या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले की, नक्कीच घेईल. हा जो बदल झाला आहे. तो बदल लगेच दिसून येणार नसला, तरी मराठी माणूस कोणत्याही कामात कमी नाही की, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. त्याला आता संधी चालून आली आहे. बदल होण्यास थोडा वेळ लागेल; मात्र मराठी माणूस काम करणारच नाही, असा खोडसाळ दावा केला जात आहे, तो मला योग्य वाटत नाही.
पाणीपुरीच्या व्यवसायात मराठी माणूस नव्हताच, असे नाही. काही मराठी माणसेही पाणीपुरी विकत होते. त्यांची संख्या कमी होती, इतकेच. आता ही संख्या नक्कीच वाढेल. पाणी, लॉण्ड्री आदी व्यवसायांत मराठी माणसाचा शिरकाव होईल, याची मला खात्री आहे. अशा प्रकारची हिंमत करणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीशी आमचा पक्ष नेहमी असेल. त्यासाठी त्यांना काही मदत व प्रशिक्षण द्यावे लागले, तरी मनसे त्यासाठी पुढाकार घेणार आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
नाशिक येथील एक उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, नाशिकच्या एका खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये परप्रांतीयांचा भरणा होता. आता त्याच कंपनीत चार हजार सुरक्षारक्षक आहे. त्यापैकी ९० टक्के मराठी सुरक्षारक्षक आहेत. परप्रांतीयांविरोधात शिवाजी पार्क, दादर येथे आंदोलन करण्यात आले, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात मराठी माणसे भेळ विकत होती. नगर, नाशिक, कोल्हापूर येथील भेळ भडंग प्रसिद्ध आहे. त्यामुळे भेळचा व्यवसाय मराठी माणूस करत होता.
१९९५ पूर्वी नाक्यावर गेल्यावर परभणी, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील मराठी माणूस नाका कामगार होता. त्यानंतर, परिस्थिती बदलली. मराठी माणूस नाक्यावरून परप्रांतीयांमुळे हद्दपार झाला.
आजही परप्रांतीय गावी गेल्याने आयटी क्षेत्रात गॅप पडलेला नाही. केवळ कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रात मजूर लागत होते. त्याठिकाणी कामगार कमी पडतील.
मराठी माणूस मेहनती
परप्रांतीय कामगार हा अकुशल कामगार होता. महाराष्ट्रात असंघटित स्वरूपात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. मराठी माणूस हा दगडातून पैसा काढणारा आहे. याचा अर्थ असा की, तो प्रचंड कष्ट करतो. त्यामुळे ही कष्टाची कामे तो नक्कीच करेल. लॉकडाउननंतर मराठी माणूस महाराष्ट्राचे नवनिर्माण करेल, असा मला ठाम विश्वास आहे.
नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या - डॉ. किणीकर
अंबरनाथ : लॉकडाउनमुळे अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद असल्याने कारखानदार व कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्यासह कारखानदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे बैठक घेतली. लॉकडाउनमुळे परराज्यांतील कामगार हे त्यांच्या गावी परतत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या, असे आवाहन किणीकर यांनी कारखानदारांना केले. बैठकीदरम्यान कारखानदारांच्या समस्याही जाणून घेतल्या. मकरंद पवार, परेश शहा, विजयन नायर, राज पांडे आदी उपस्थित होते.