Navratri 2020: आता नवरात्रीसाठी नऊ रंगांचे मास्क बाजारात; महिलांकडून मागणी, साडीलाही हाेणार मॅचिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 08:04 AM2020-10-15T08:04:41+5:302020-10-15T08:05:31+5:30
नऊ रंगांचा सेट: शनिवारपासून सुरु हाेणार उत्सव
ठाणे : कोरोना काळात मास्कला मागणी प्रचंड वाढली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते घालण्याचे आवाहन सातत्याने सरकारकडून केले जात आहे. तो आता दैनंदिन जीवनातला घटक बनला आहे. दोन दिवसांवर आलेले नवरात्री उत्सवाचे दिवस पाहता नऊ रंगांच्या साडीला मॅचिंग नऊ रंगांचे मास्कही बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे या नऊ रंगी मास्कला नोकरदार महिलांकडून अधिक मागणी आहे.
शनिवारपासून सुरू होणारा नवरात्रौत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने शहरातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना केले आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी रंगणाऱ्या दांडियारासलाही कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. नवरात्रीत नऊ रंगांना अधिक महत्त्व असते. महिला वर्गामध्ये या नऊ रंगांचे अधिक आकर्षण असल्याने त्या त्या दिवसाच्या त्या त्या रंगाप्रमाणे साडी/ड्रेसबरोबर त्याला मॅचिंग टॅटू काढण्याचाही अलीकडे ट्रेण्ड आहे. सध्या कोरोनामुळे हे सर्व बंद असले तरी त्या त्या रंगांना मॅचिंग मास्क बाजारात आले आहेत.
केवळ महिलांसाठी नव्हेतर, अगदी पुरुषांसाठीही ते आले आहेत. राखाडी, नारिंगी, सफेद, लाल, गडद निळा, पिवळा, हिरवा, मोरपंखी, जांभळा हे नऊ रंग यंदा असून, त्याप्रमाणे ते उपलब्ध आहेत. महिलांसाठी आकर्षक म्हणून त्याला लेस लावण्यात आली आहे तर पुरुषांसाठी इलॅस्टिक लावली असल्याचे फॅशन डिझायनर शिल्पा चव्हाण यांनी सांगितले. वक्र आणि त्रिकोणी आकारांत ते उपलब्ध असून त्रिकोणी आकारांतले मास्क वाहनचालक वापरू शकतात. महिलांसाठी यात खणांचे आणि काठांचे कॉटन मास्क आहेत. ते नक्कीच महिलांना आवडतील असे सांगितले.
ज्यांना नऊ रंगांचा सेट हवा ते पूर्ण सेट घेतात. ज्यांना एकच रंग हवा आहे ते त्या रंगाचा घेतात. पण नऊ रंगांचे मास्क घेण्यांत नोकरदार महिलांचे प्रमाण अधिक आहे. यंदा या मास्कमुळे नवरात्र रंगी बेरंगी साजरी हाेणार. - शिल्पा चव्हाण, फॅशन डिझायनर