ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

By Admin | Published: October 13, 2015 02:00 AM2015-10-13T02:00:08+5:302015-10-13T02:00:08+5:30

आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Navratri festivities of Thousand idols arrive in Thane | ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

ठाण्यात सर्वत्र नवरात्रीची धूम दीड हजार मूर्तींचे आगमन

googlenewsNext

ठाणे : आदीशक्तीच्या नवरात्रोत्सव उद्यापासून (दि.१३) सुरू होत आहे. या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ या परिमंडळांचा समावेश होतो. या पाचही परिमंडळांमध्ये नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी रासगरबा-दांडियाही रंगणार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये १ हजार ४५४ दुर्गादेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना तर सुमारे १ हजार ९०० घटांची स्थापना करण्यात येणार आहेत.
ठाणे शहरात सार्वजनिक स्वरूपाच्या १४४ तर घरगुती स्वरूपाच्या १९० मूर्ती आणि सार्वजनिक स्वरूपाचे १० आणि घरगुती ५२१ घट स्थापन करण्यात येणार आहेत. कल्याणमध्ये ७९ सार्वजनिक अन् २२८ घरगुती मूर्ती तर ६ सार्वजनिक आणि ९ घरगुती घटांची; उल्हासनगरात १३३ सार्वजनिक आणि १६३ घरगुती मूर्ती तर १७ सार्वजनिक आणि ३२३ घरगुती घट; अंबरनाथमध्ये सार्वजनिक १३३ मूर्ती, ११४ घरगुती मूर्ती तर ९ सार्वजनिक, ३० घरगुती घट स्थापन करण्यात येणार आहेत. तर, वागळे परिमंडळामध्ये १५१ सार्वजनिक, १४९ खासगी मूर्ती तर १४ सार्वजनिक आणि ९६२ खासगी घट प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, ठाणे शहरात या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ठाणे पोलीस कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला गेले होते. त्यामुळे इंडो-तिबेटीयन पोलिसांना पाचारण केले होते. या वेळी हे सर्व पोलीस ठाण्यात परतले असल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसला तरी राज्य राखीव पोलीस दल (एसआरपी) आणि होमगार्डच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि आगरी, कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी, कालिका आणि रेणुका मातेच्या नवरात्र उत्सव १३ पासून साजरा होणार आहे. मात्र राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सदर उत्सवावर जास्त खर्च न करता साधेपणाने करण्याचे देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.
या उत्सवात ठाणे जिल्ह्याबरोबर मुंबई, नाशिक, रायगड आणि शेजारील गुजरात राज्यातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. या उत्सवात मंगळवारी घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे आणि नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम होणार असून विजयादशमीला देवीचे खास आकर्षण असलेला पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मंदिरावरील जास्तीची रोषणाई, फुलांची आरास, किर्तने अशा प्रकारचा खर्च न करता सदर उत्सव साधेपणाने करण्यात येणार असल्याचा देवस्थान समितीने निर्णय घेऊन एक लाखांचा धनादेश दुष्काळ निवारण फंडासाठी मंदिर समितीने दिला.
नवरात्र उत्सवास उद्यापासून प्रारंभ होत असून उद्या मध्यान्हापर्यंत घटस्थापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. बी पेरल्यानंतर नवव्या दिवशी अंकुर फुटतो. गर्भधारणा झाल्यावर ९ महिने ९ दिवसांनी प्रसूती होते. असा हा ९चा महिमा आहे.
नवरात्र म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असून ती ९ दिवस करायला सांगितली असल्याचे सोमण यांनी सांगितले. या दिवसांत शेतात तयार झालेले धान्य घरी येते. पूर्वी लोक क्षेत्रपूजा करून सीमोल्लंघन करत असत.
आज अज्ञान, आळस, अनीती, भ्रष्टाचार यातून सीमोल्लंघन करण्याची गरज आहे. यंदा राज्याचा बराच भाग अवर्षणग्रस्त असल्यामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Navratri festivities of Thousand idols arrive in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.