नवरी नटली गं बाई..पाचवी-सहावी लाइन सुटली; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:11 AM2022-02-18T10:11:18+5:302022-02-18T10:11:47+5:30
रेल्वेमंत्री व राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाकरिता दोन दिवसांत ठाणे स्टेशनचे रूपडे पालटले आहे.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकात कोपऱ्या-कोपऱ्यात प्रवाशांनी पान, गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी झटत आहेत... भिंतींवर चिकटवलेली पोस्टर्स खरवडून काढण्याची धडपड सुरू आहे... धूळ, जळमटे असलेले पंखे स्वच्छ झाल्याने गार वारा स्टेशनभर पसरला आहे. सरकते जिने सुरू असल्याची दहा-दहा वेळा खात्री केली जात आहे. एखाद्या नवरीसारखे ठाणे स्टेशन सजले आहे. कारण आहे, मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवादरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणाऱ्या ऑनलाइन लोकार्पणाचे. या कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ठाण्यात उपस्थित राहून लोकलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
रेल्वेमंत्री व राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाकरिता दोन दिवसांत ठाणे स्टेशनचे रूपडे पालटले आहे. मुख्य कार्यक्रमासाठी फलाट क्रमांक १० बाहेर व्यासपीठ बांधले असून, ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या फलाटांवरील प्रवाशांना हा सोहळा पाहता येणार आहे. स्टेशनच्या बाहेर बसणारे फेरीवाले, स्टेशनच्या परिसरात फिरणारे गर्दुल्ले तसेच फलाट क्रमांक १० च्या बाहेर उभे राहणारे रिक्षावाले सारेच गायब आहेत. त्यामुळे स्टेशनकडे येणारे रस्ते मोकळे झाले आहेत. फलाट क्र. १० वरून पूर्वेला जाणारे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे ट्रेनमधून उतरलेले प्रवासी वैतागले होते.
सायंकाळी लोकार्पण
ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रसाधनगृहे झाली स्वच्छ
खराब झालेले कचऱ्याचे डबे गायब असून, काही ठिकाणी नवीन कचऱ्याचे डबे बसवले आहेत. प्रसाधनगृहे स्वच्छ झाली आहेत.
रेल्वे रुळातील पट्ट्यांनाही रंगरंगोटी केली आहे. स्थानकातील स्टॉल्सपाशी खरकटे कागद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी स्टॉल कर्मचाऱ्यांवर दिली आहे. रेल्वे पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.