नवाजुद्दीन सिद्दीकीची पोलिसांना हुलकावणी, योग्य वेळी चौकशीसाठी जाणार, वकिलांचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 06:20 AM2018-03-14T06:20:23+5:302018-03-14T06:20:23+5:30
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावूनही बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अद्याप पोलिसांसमोर हजर झाला नाही.
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावूनही बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अद्याप पोलिसांसमोर हजर झाला नाही. या प्रकरणात होत असलेल्या आरोपांप्रकरणी नवाजने संताप व्यक्त केला असून, त्याची पत्नीही त्याच्या बाजूने उभी राहिली आहे.
मोबाइलचे सीडीआर बेकायदेशीरपणे मिळविणाºया आरोपींचे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले. देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित, काही खासगी गुप्तहेर आणि यवतमाळच्या एका पोलीस कर्मचाºयासह ११ आरोपींना पोलिसांनी या प्रकरणामध्ये अटक केली होती. गेल्या आठवड्यात या प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नवाजुद्दीनचे त्याच्या पत्नीसोबत मध्यंतरी कौटुंबिक वाद सुरू होते. त्या वेळी त्याच्या पत्नीच्या मोबाइल फोनचा सीडीआर बेकायदेशीर पद्धतीने मिळविण्यात आला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिझवान सिद्दीकी यांनी या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रशांत पालेकर याच्याकडून, नवाजच्या पत्नीचा सीडीआर मिळविल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्या अनुषंगाने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्यांची पत्नी आणि अॅड. रिझवान सिद्दीकी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. मात्र, आठ दिवस उलटूनही त्याने पोलिसांसमोर हजेरी लावलेली नाही.
या प्रकरणी उच्चपदस्थ पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजुद्दीन दोन दिवसांपूर्वी ठाण्यात येऊन गेला. मात्र, पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील प्रसार माध्यमांची गर्दी पाहून त्याने बेत बदलला. ठाण्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडे जाऊन त्याने काही वेळ घालविला. त्यानंतर, तो थेट मुंबईला परत गेल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. नोटीस बजावून एखादी व्यक्ती चौकशीसाठी पोलिसांकडे येत नसेल, तर अशा वेळी त्याला आठवण करून देण्यासाठी पुन्हा नोटीस बजावली जाते. दुसºया नोटीसलाही त्या व्यक्तीने जुमानले नाही, तर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी दिली.
नवाजुद्दीनच्या प्रकरणामध्ये ती वेळ येईलच, असे आताच सांगणे कठीण असल्याचेही अधिकारी म्हणाले. नवाजुद्दीनचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सीडीआर प्रकरणामध्ये आरोप माझ्या अशिलावर झालेत. हे प्रकरण थेट माझ्याशी संबंधित नाही. त्यामुळे या वेळी या संदर्भात काहीही बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असे अॅड. रिझवान सिद्दीकी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. नवाजुद्दीन सिद्दीकी हे सध्या अतिशय व्यस्त आहेत. ते योग्य वेळी पोलिसांकडे चौकशीसाठी जातील, असेही ते म्हणाले.
>आरोप संतापदायक
सीडीआर प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख न करता, नवाजुद्दीनने टिष्ट्वटद्वारे संताप व्यक्त केला आहे. शनिवारी सकाळी मुलीच्या शाळेत एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या वेळी प्रसार माध्यमांकडून माझ्यावर आरोपांच्या फैरी झाडल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. हे संतापदायक असल्याचे टिष्ट्वट त्याने केले आहे.
>आरोप निराधार
नवाजुद्दीने टिष्ट्वट केल्यानंतर त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने फेसबूकच्या माध्यमातून पतीची बाजू उचलून धरली. सीडीआर प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. नवाजवर लावलेले सर्व आरोप धादांत खोटे आणि निराधार आहेत. सेलिब्रिटी असल्याने नवाजला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही आलियाने केला आहे.
रजनी पंडित यांची आज सुटका
सीडीआर प्रकरणामध्ये जवळपास एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची बुधवारी सकाळी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश
ए. एस. भैसारे यांनी सोमवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यांच्या मुक्ततेचे आदेश त्यांच्या वकील पूनम जाधव यांनी मंगळवारी न्यायालयाकडून प्राप्त केले. मात्र, आदेश मिळेपर्यंत ५ वाजून गेले होते. त्यामुळे रजनी पंडित यांची सुटका बुधवारी सकाळी होईल, अशी माहिती अॅड. पूनम जाधव यांनी दिली.