पोषण आहारवाटपात नाईक फाउंडेशनचा घोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:09 AM2019-05-31T01:09:45+5:302019-05-31T01:10:10+5:30

जि.प. सदस्यांच्या तक्रारी : भिवंडी तालुक्यातील भ्रष्टाचार शिगेला

Nayak Foundation's muck of nutrition! | पोषण आहारवाटपात नाईक फाउंडेशनचा घोळ !

पोषण आहारवाटपात नाईक फाउंडेशनचा घोळ !

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये घोळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केल्या. भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना नाईक फाउंडेशनकडून पोषण आहारवाटपात घोळ केला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचे सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन सर्वसाधारण सभेत चांगलेच धारेवर धरले.
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार दिला जात आहे. त्यात ठिकठिकाणी कमीअधिक प्रमाणात संबंधित ठेकेदारांकडून घोळ केला जात असल्याचे या आधीदेखील सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले आहे. त्यातील भ्रष्टाचार नियंत्रणास आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भिवंडी तालुक्यातील शाळांमध्ये वाटप होणाºया पोषण आहारातही भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचे सदस्यांनी निदर्शनात आणून त्यावर या सोमवारच्या बैठकीत जोरदार चर्चा घडवून आली. या आहारवाटपात नाईक फाउंडेशनकडून फसवणूक केली जात आहे, तरीदेखील प्रशासनाकडून त्यांच्या बिलांची रक्कम काढून दिली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सदस्यांनी सभागृहात केला.

नाईक फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना बंद पाकिटांमध्ये पोषण आहारवाटप केले जाते. वर्गातील उपस्थित विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्येक दिवशी नोंद घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसारच पोषण आहारबिलाची रक्कम संबंधित नाईक फाउंडेशनला देणे अपेक्षित आहे. पण, उपस्थित विद्यार्थीसंख्येऐवजी भिवंडी तालुक्यातील सर्व शाळांमधील एकूण विद्यार्थी पटसंख्येवर पोषण आहारच्या बिलाची रक्कम अदा केली जात असल्याची गंभीर बाब सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिली. या आरोपास अनुसरून नाईक फाउंडेशनच्या बिलांची रक्कम अदा केली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

अधीक्षकांकडून मागवला अहवाल
या नाईक फाउंडेशनची तक्रार प्राप्त होताच भिवंडीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अधीक्षकांकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर सादर करण्यात येत असलेल्या देयकांच्या पत्रकाची सुधारित पूर्तता करण्यासाठी फाउंडेशनला चौकशी पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या बिलांची रक्कमही थांबवण्यात आल्याचे पोषण आहारवाटप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अन्य तालुक्यांप्रमाणेच भिवंडी तालुक्यात पोषण आहारवाटपासाठी बचत गट पुढे आल्यास त्यांना काम देण्यात येईल. नाईक फाउंडेशनकडून ते काम काढून घेण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट करून या पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरणावरील चर्चेस थांबवण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Nayak Foundation's muck of nutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.