शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 06:22 AM2023-08-04T06:22:54+5:302023-08-04T06:24:00+5:30
संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे : येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ एनसीसी कॅडेट शुभम प्रजापती याने बांबूने अमानुष मारहाणीची शिक्षा केल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. गुरुवारी त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा तीव्र शब्दांत ठाणेकरांनी धिक्कार केला.
संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील जोशी-बेडेकर, बांदोडकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना एनसीसीचे संयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. लष्कर, नौदल प्रशिक्षणाचे धडे देताना विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास त्यांना शिक्षा करण्यात येते. प्रशिक्षणातील चुकीसाठी पाण्यात ओणवे उभे राहायला सांगून भर पावसात विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर प्रजापती याने बांबूने फटके दिले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीमहाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन चौकशी केली.
मारहाणीची घटना वाईट आहे. कोणी कोणाला मारू नये. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. चांगले-वाईट घडत असते, मी कोणाचे समर्थन करत नाही. जे घडले ते चुकीचे आहे. महाविद्यालयाने या घटनेची दखल घेतली आहे. जो मारतोय त्याचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे, शिस्त लावण्याची ही पद्धत नाही. त्याच्यावर अवश्य कारवाई व्हायला पाहिजे.
- डॉ. विजय बेडेकर, अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ
मारहाणीचा प्रकार कधी घडला, ती कोणाकोणाला झाली, हा प्रशिक्षणाचा भाग आहे की, यात वेगळा काही उद्देश आहे या सर्व बाबी विद्यार्थ्यांकडून तपासल्या जात आहेत. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.
- गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर
माजी विद्यार्थिनीने काढला व्हिडीओ, तक्रार नाही
- मारहाणीची घटना जुनी आहे. लायब्ररीमधून एका माजी विद्यार्थिनीने हा व्हिडीओ तयार केला होता. व्हिडीओ व्हायरल करणे माझा हेतू नव्हता, असे तिने सांगितले.
- व्हिडीओ बनवणारी ही विद्यार्थिनी फक्त अभ्यासासाठी येत होती. तिला बाहेरून ओरडतानाचा आवाज आला आणि त्यानंतर तिने हा व्हिडीओ काढला. तो तिने स्टेटसला ठेवला. दोन-तीन जणांनी तो शेअर केला आणि तो गुरुवारी व्हायरल झाला.