राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला छगन भुजबळांचा पुतळा
By अजित मांडके | Published: August 28, 2023 01:11 PM2023-08-28T13:11:44+5:302023-08-28T13:11:56+5:30
आमच्या दैवताचे फोटो वापरून त्यांचाच अपमान करणार असाल तर आम्ही सहन करणार नाही, असा दिला इशारा
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांचा पुतळा जाळला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
बीड येथे झालेल्या अजीत पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. "साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल" असे म्हणत अत्यंय जहरी टीका केली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले.
जिल्हाध्यक्ष सुहास देसाई , महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार अशी संभावना करीत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशाराही देसाई यांनीही दिला.