जितेंद्र आव्हाड अटकेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
By जितेंद्र कालेकर | Published: November 11, 2022 05:20 PM2022-11-11T17:20:10+5:302022-11-11T17:22:57+5:30
चित्रपटगृहतील प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी ठाण्यात माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ जणांना अटक, पोलीस बंदोबस्तात वाढ
ठाणे: विवीयाना मॉल मधील चित्रपट गृहतील एका प्रेक्षक दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हरहर महादेव चित्रपटावरून मॉलमधील मारहाणप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.
आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण १ वाजता वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर पोलीस उपायुक्त विनय राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. दरम्यान, आव्हाड यांनीच ही माहिती ट्विट द्वारे दिल्यामुळे ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याला दुपारी ३ वाजल्यापासून घेराव घालत आंदोलन केले. आव्हाड साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है, जितेंद्र आव्हाड अंगार है, बाकी सब भंगार है, सरकार डरती, पोलीस को आगे करती है, अशी जोरदार घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.