कर्नाटकच्या घटनेचा असाही निषेध, राष्ट्रवादीने केला शिवरायांना दुग्धाभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:45 PM2021-12-19T13:45:37+5:302021-12-19T13:46:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने केला शिवरायांना दुग्धाभिषेक, बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन
ठाणे : कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचेमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही छोटी घटना असल्याचे विधान केल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. तसेच बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पलांनी मारले.
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत बसवराज यांच्या प्रतिमेस जोडे मारले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. तर अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मुफ्ती सय्यद अश्रफ यांनी, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या समाजकंटकांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, या आंदोलनात महिला शहराध्यक्ष सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, सरचिटणीस प्रभाकर सावंत,रविंद्र पालव, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, परिवहन सदस्य नितीन पाटील, कैलाश हावले आणि मुफ्ती अशारफ सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.