"आपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे"; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 03:38 PM2022-03-13T15:38:32+5:302022-03-13T15:50:09+5:30

NCP Anand Paranjpe Slams Nitesh Rane : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NCP Anand Paranjpe Slams Nitesh Rane Over Sharad Pawar Statement | "आपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे"; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला

"आपली उंची किती, आपण बोलतो किती याचे भान ठेवावे"; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला

Next

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्‍या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो गुन्हे दाखल करण्यासंदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना आश्वासित केले आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी आपली उंची तपासावी आणि नंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. निलेश राणे हे पूर्वी रात्रीचे 'औषध' घेत होते. आता त्यांनी दिवसाही औषध घ्यायला सुरूवात केली असावी. त्यामुळेच ते काहीबाही बरळत आहेत,  असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (NCP Anand Paranjpe) यांनी लगावला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार हे दाउदचे हस्तक असल्याचे म्हटले होते तर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांच्या ट्वीटची रीळ ओढत शरद पवार यांना दाऊदचा हस्तक तसेच पाकिस्तानी एजंट असे संबोधन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. हरी निवास सर्कल ते पोलीस ठाणे असे चालत जावून हा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी फिर्याद देऊन भादंवि 120 ब, 153, 153(अ) , 499, 500,505 (1) ,505 (1) क , अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी फिर्यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, राणे बंधू हे वारंवार शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करीत असतात. ही टीका आणि आरोप करण्यापूर्वी निलेश आणि नितेश या राणे बंधुंनी आपली उंची तपासावी, त्यानंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. पवार साहेब हे निलेश आणि नितेश राणे यांच्या वयापेक्षा अधिक सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. याची जाणही या राणे बंधूंना नाही. राणे बंधूंची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी आपली वैचारिक कुवत ओळखून भाष्य करावे; अन्यथा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. असा इशारा परांजपे यांनी दिला.

यावेळी विरोधीपक्ष नेते शानू पठाण, परिवहन सदस्य प्रकाश पाटील, ठाणे महिलाध्यक्षा सुजाता घाग,  महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, ठाणे युवाध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, कार्याध्यक्ष रमेश दोडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, लीगल सेलचे अध्यक्ष विनोद उतेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, असंघटीत सेलचे अध्यक्ष राजू चापले, हॉकर्स सेलचे अध्यक्ष  सचिन पंधारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या  जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य,  महिला कार्यकारिणीच्या सर्व सदस्या, युवक कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: NCP Anand Paranjpe Slams Nitesh Rane Over Sharad Pawar Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.