समाजमंदिरावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; उल्हासनगरात महापालिकेचा विना परवाना वापर
By सदानंद नाईक | Published: June 26, 2023 06:16 PM2023-06-26T18:16:44+5:302023-06-26T18:17:05+5:30
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्यक्ष प्रभागात कोट्यवधी रुपये खर्चून समाजमंदिर बांधण्यात आले.
उल्हासनगर: कॅम्प नं-३ येथील समाजमंदिराचा विना परवाना वापर होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित माखिजानी यांनी महापालिका आयुक्ताकडे करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर सील करण्यात आलेले समाजमंदिर पुन्हा उघडल्याने, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून विरोध होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्यक्ष प्रभागात कोट्यवधी रुपये खर्चून समाजमंदिर बांधण्यात आले. मात्र त्याची देखभाल होत नसल्याने बहुतांश संजमंदिराची दुरावस्था झाली. तर अनेक समाजमंदिर अद्यापही सामाजिक संस्था व माजी नगरसेवक यांच्या ताब्यात राहिल्याचे चित्र शहरात आहे. दरम्यान खेमानी परिसरातील समाजमंदिरात विना परवाना डान्स क्लास सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी अजित माखिजानी यांना मिळल्यावर त्यांनी याचा भांडाफोड करून तक्रार महापालिकेला दिली. महापालिका कर्मचाऱ्यांनी शनिवारी समाजमंदिर सील करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा समाजमंदिर सुरू झाल्याने, अजित माखिजानी यांनी आयुक्त अजित शेख यांची भेट घेऊन समाजमंदिराचा दुरूपयोग केल्या बाबत तक्रार केली. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकांचे समाजमंदिर बाहेर व आत पोस्टर्स कसे? असा प्रश्न करून कारवाई करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी १०० पेक्षा जास्त समाजमंदिर बांधण्यात आले. मात्र त्यांची देखभाल होत नसल्याने, त्यांची दुरावस्था झाली. सामाजिक संघटना व माजी नगरसेवकाच्या ताब्यात असलेल्या मंदिराचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले. गेल्या १५ दिवसापूर्वी चोपडा कोर्ट परिसरातील एका समाजमंदिराची वापर एक माजी नगरसेवक करीत असल्याचे उघड झाल्यावर, महापालिकेने समाजमंदिर ताब्यात घेतले. तसेच संभाजी चौकातील समाजमंदिर असेच महापालिकेने ताब्यात घेतले आहे. समाजमंदिर महापालिकेच्या ताब्यात असून त्यावर प्रभाग समिती अधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले. असे असलेतरी विविध राजकीय पक्षाचे नेते व तथाकथित समाजसेवक समाजमंदिराची गैरवापर करीत असल्याचे उघड झाले. महापालिकेने समाजमंदिर ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.