कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेची पुलावर धाव
By अजित मांडके | Published: October 4, 2022 06:33 PM2022-10-04T18:33:45+5:302022-10-04T18:34:11+5:30
कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्याची राष्ट्रवादी आणि मनसेने मागणी केली आहे.
ठाणे : कळवा खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ती मार्गिका नवरात्रोत्सवात खुली केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र ती खुली न झाल्याने मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने ही लेन खुली करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर हा पुल मुख्यमंत्र्यांनी खुला केला नाही तर मनसे हा पुल खुला करेल असा इशारा मनसेने दिला.
कळवा खाडी पुलावर अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या खाडी पुलावरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी तिसऱ्या खाडी पुलाची निर्मिती येथे करण्यात आली आहे. या पुलाच्या साकेत ते कळवा नाका या लेनचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु ही लेन अद्यापही खुली करण्यात आलेली नाही. ही लेन खुली करण्यासाठी यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन आयुक्तांची देखील भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी या पुलाची एक मार्गिका नवरात्रोत्सवात खुली केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु आता दसऱ्याचा मुहुर्तही हुकल्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पुलाची पाहणी केली. या पुलाची एक मार्गिका पूर्ण झालेली आहे, आम्हाला त्याचे उदघाटन करायचे नाही. मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे उदघाटन करावे, त्यांनी येथे मोठा कार्यक्रम न घेता, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून केवळ आपली गाडी या ठिकाणाहून फिरवा आणि हा पुल खुला करावा अशी मागणी आव्हाड यांनी केली.
ठाण्यातील पहिले मोठे उदघाटन आहे, त्यामुळे या पुलाचे क्रेडीट आम्हाला घ्यायचे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच हा पुल खुला करावा, केवळ वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी हा पुल खुला करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दुसरीकडे मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी देखील या पुलाची पाहणी केली. या पुलाचे काम पूर्ण झाले असतांनाही तो खुला का केला जात नाही, असा सवाल यावेळी त्यांनी केला. ही लेन खुली झाल्यास वाहतुक कोंडीला देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाची लेन खुली करुन ठाणोकरांना दिलासा द्या. अन्यथा मनसे या पुलाचे उदघाटन करेल असा इशाराही त्यांनी दिला.