मॅनहोल दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीची एमआयडीसीवर प्रश्नांची सरबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 05:42 AM2018-11-11T05:42:11+5:302018-11-11T05:42:27+5:30

खंबाळपाडा मॅनहोल दुर्घटना : अधिकाऱ्यांवरील कारवाईचे काय?

NCP ask Question to MIDC on the Manohol mishap | मॅनहोल दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीची एमआयडीसीवर प्रश्नांची सरबत्ती

मॅनहोल दुर्घटनेवरुन राष्ट्रवादीची एमआयडीसीवर प्रश्नांची सरबत्ती

googlenewsNext

डोंबिवली : ठाकुर्लीनजीकच्या खंबाळपाडा येथे मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पत्र पाठवून काही प्रश्न विचारले आहेत.

मॅनहोलमधील गॅसमुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबरला घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंत्राटदाराला अटक केली आहे. ज्या मॅनहोलमध्ये कामगार उतरले, तेथे सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नव्हती. अभियांत्रिकी कार्यवाहीत नमूद असलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्यात एमआयडीसी प्रशासन असमर्थ ठरल्याचा आरोप मनसेने केला आहे. एमआयडीसीवर सोमवारी त्यांनी धडक देत मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी केली. ही कार्यवाही दिवाळीपूर्वी न केल्यास ऐन दिवाळीत एमआयडीसीविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.
दुसरीकडे, या घटनेला एमआयडीसी प्रशासन जबाबदार असल्याने कंत्राटदाराबरोबरच अधिकाºयांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमिक जनता संघाने केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून काही प्रश्न विचारून खुलासा मागितला आहे. मॅनहोलच्या साफसफाईचे काम चालू असताना व त्याची पाहणी करण्यासाठी एमआयडीसीने कोणत्या अधिकाºयाची नियुक्ती केली होती व त्यांच्यावर काय कार्यवाही केली, असा प्रमुख सवाल करताना तपासे यांनी सुरक्षिततेविषयी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

‘जगणं महाग, मरण स्वस्त’
भूमिगत रासायनिक सांडपाणी वाहिनीची स्वच्छता करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा अलीकडेच गुदमरून मृत्यू झाला होता. डोंबिवलीतील तरुण चित्रकार स्वप्नील सुनील नायक यांनी मॅनहोलमध्ये उतरून स्वच्छता करणाºया सफाई कामगारांच्या आयुष्यातील भयावय सत्य आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहे. या चित्राला त्यांनी ‘जगणं महाग, मरण स्वस्त’ हे शीर्षक दिले आहे. पेन्सीलद्वारे रेखाटलेल्या या चित्रात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटचा उत्तम मेळ साधला आहे. स्वप्नील हे साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकत असून त्यांना भविष्यात जे. जे. कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. आतापर्यंत त्यांनी ७० चित्रे रेखाटली असून पेन्सीलबरोबर जलरंगाचा वापर केला आहे.

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले का?
मृत कामगारांना कंत्राटदाराने पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) दिले होते का व इतर कंत्राटदार त्यांच्या कामगारांना पीपीई देतात की नाही, त्याची एमआयडीसी दक्षता घेते का, मॅनहोलचे सफाईचे काम सुरू असताना सुरक्षा अधिकारी नेमला होता का, एमआयडीसीने तयार केलेल्या सुरक्षा नियमांचे (एचएसई) पालन होते का, कामगारांचा विमा काढला होता का, कंत्राटदाराकडे कायमस्वरूपी किंवा कंत्राटी तत्त्वावर कामावर होते का, मृत कामगारांच्या कुटुंबीयांना किती भरपाई दिली, कंत्राटदाराचे इतर कामकाज बंद करून त्याला काळ्या यादीत टाकले आहे का? असे प्रश्न तपासे यांनी विचारले आहेत. आता या प्रश्नांवर एमआयडीसी काय खुलासा करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: NCP ask Question to MIDC on the Manohol mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.