शाई धरणाला राष्ट्रवादीनेच केला होता विरोध, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:23 PM2018-12-25T16:23:26+5:302018-12-25T16:24:55+5:30
शाई धरणाच्या मुद्यावरुन आता राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने शाई धरणाचा हट्ट धरला असतांना, दुसरीकडे राष्ट्रवादीनेच या धरणाला विरोध केला होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
ठाणे - पाण्याच्या समस्येवर ठाणे महापालिकेने इतर महत्वाचे प्रकल्प बाजूला ठेवून आधी शाई धरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी ने लावून धरली आहे. परंतु त्यांच्या मागणीची हवा शिवसेनेने काढली आहे, एमएमआरडीएने हे धरण बांधावे असा ठराव यापूर्वीच मंजुर झाला आहे. त्यावर तेव्हांचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचीसुध्दा स्वाक्षरी आहे. त्यातही हे धरण होऊ नये यासाठी राष्ट्रवादीच्याच मंडळींनी आंदोलन केले होते, असा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत शाई धरणाचा वाद चिघळणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
पाण्याच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि भविष्याचा विचार करुन ठाण्याला हक्काचा धरण झालेच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केली आहे. तसेच बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येला वाचा फोडण्यात आली असून प्रशासनाने आणि महापौरांनी शाई धरण बांधण्याचा निर्णय जाहीर करावा अन्यथा प्रत्येक महासभेत आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेने सुध्दा आपली बाजू मांडली आहे. शाई धरण होऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आंदोलने केली होती, कदाचित हे आव्हाडांना माहिती नाही का? असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. त्यातही शाई धरणाचे काम पालिकेला करता येऊ शकत नाही, म्हणून ते धरण एमएमआरडीएने बांधावे असा ठराव सुध्दा तत्कालीन महापौर अशोक वैती यांच्या काळात झाला होता. त्या ठरावावर राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांची स्वाक्षरी आहे. परंतु आता शाई धरण व्हावे ही मागणी आमदार का करीत आहेत, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. केवळ प्रसिध्द मिळावी याच हेतूने हे सर्व प्रकार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. धरण व्हावे ही आमची सुध्दा इच्छा आहे. परंतु बांधणे पालिकेला केव्हांच शक्य होणार नाही. त्यामुळे धरण बांधण्याची विनंती शासनाकडे करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र आल्यास तशी विनंती शासनाला केल्यास शासन त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलले अशी आशासुध्दा त्यांनी शेवटी व्यक्त केली.