“भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:40 PM2022-01-31T17:40:48+5:302022-01-31T17:42:22+5:30
उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
ठाणे: देशात आताच्या घडीला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर (UP Election 2022) भाष्य केले आहे. भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
मुंब्रामध्ये विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. माझ्यावर बुलंदशहर मधील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे. पण काही जण भाजपची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मत कोणाला दिले पाहिजे, हे तुम्ही ठरवा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
... तर ते जिंकतील
भावनेच्या आधारे राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पडणार. पण जिंकणार कोण? तर ते जिंकतील. पण नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार? या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे, असे सांगत भाजपला हरवायला पाहिजे, हे महत्वाचे आहे. भाजपला हरवा, हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जाऊन लोकांना सांगा. मी स्वतः उत्तर प्रदेश मध्ये जाऊन भाजपविरोधात प्रचार करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफील राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार, तेच तुमचे भविष्य असणार आहे. तुमचे भविष्यच जर बिघडणार असेल, तर भाजपला संपवून टाका, असे आवाहन करतानाचे माझे हे भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.