मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Published: September 7, 2022 04:10 PM2022-09-07T16:10:10+5:302022-09-07T16:11:42+5:30

प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

ncp jitendra awhad said only the middle class will now teach the railways a lesson | मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील: डॉ. जितेंद्र आव्हाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्ेवच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल?  प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही,  असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.  

एसी लोकलच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले की, एसी लोकलच्या विरोधातील पहिले आंदोलन हे कळव्यातून सुरु झाले. त्यानंतर बदलापूर आणि ठाण्यात झाले. पण, सर्वाधिक प्रतिसाद हा ठाण्यातून मिळत आहे. ठाण्यातून सुटणारी 9 वाजून 3 मिनिटांची एक लोकल रद्द केली आहे. या लोकलमधून सर्व मंत्रालयीन कर्मचारी मुंबईला जायचे. त्याच लोकलच्या वेळेवर आता एसी लोकल चालविली जात आहे. आमचं हेच म्हणणं आहे की एसीच्या 100 गाड्या चालवा; पण, ज्या गरीबांच्या, नोकरदार वर्गाच्या लोकल आहेत त्या साध्या लोकलवर अन्याय का करता? यामुळे शांत असलेले वातावरण अधिक पेटवले जात आहे. एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्या रेल्वेकडून प्रसारीत केल्या जात आहेत. पण, एसी लोकलमध्ये नृत्य करता येईल, एवढी ती लोकल रिकामी असते. रेल्वेकडून केला जाणारा चांगल्या प्रतिसादाचा दावा खोटा आहे. 

कारण, आपण जेव्हा रेल्वेच्या अधिकार्‍यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीच सांगितले होते की एका एसी लोकलमधून केवळ 570 प्रवाशी प्रवास करतात. लोकांची मागणी असेल तर त्या एसी लोकल चालवा. पण, आमच्या साध्या लोकल तुम्हाला बंद करता येणार नाहीत. कळवा कारशेडमधून निघणार्‍या या प्रत्येक लोकल या साध्या होत्या. त्या आता बंद करुन त्यांच्या जागी एसी लोकल चालविल्या जात आहेत. ठाणे स्टेशनवर एकाचवेळी सुमारे 5 ते 6 हजार लोक उभे असतात. ते एसी लोकलमध्ये चढत नाहीत. मग, ते कोणत्या लोकलमध्ये चढणार, याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने द्यायला हवे. हा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कळवा- मुंब्रापुरता मर्यादीत नाही. 

याविषयी आता प्रत्येक स्टेशनवर चीड निर्माण होताना दिसत आहे. गर्दीमुळे मृत्युचे प्रमाण वाढत आहे. माणुसकीशी होणारा हा खेळ आता जर शांतपणे बघणार असू तर आपण राजकारणात राहू नये, असे आपले मत आहे. त्यामुळेच आपण पक्षीय राजकारण न करता केवळ रेल्वे प्रवाशांच्या भुमिका मांडतोय; त्यात आपली राजकीय भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: ncp jitendra awhad said only the middle class will now teach the railways a lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.