'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 08:05 AM2022-02-20T08:05:35+5:302022-02-20T08:05:56+5:30
आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड
ठाणे : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाआघाडी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी शनिवारी बैठकीत केली. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता महाविकास आघाडी व्हावी, अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांविरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे ठरले आहे. समोरुन कोणी काही बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केले.
आघाडीचा निर्णय घेण्यास आव्हाड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करत भाजपविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवत आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण राज्यात निर्माण व्हायला हवे, ही सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
शिवसेनेशी चर्चा करणार का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमण्यात आली आहे. तीन ते चार दिवसांपासून एकनाथ शिंदे ज्या मुलाखती देत आहेत; त्याकडे पाहता, ते महाविकास आघाडीकरिता सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही पक्षांत हवे सामंजस्य - शिंदे
राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्ही आघाडीच्याच बाजूने आहोत. आमच्याकडून टीकेला सुरुवात केली गेली नव्हती. समोरुन टीका होत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावे लागते. त्यामुळे सर्वांनी सांभाळून बोलावे, सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.