शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

By रणजीत इंगळे | Published: September 30, 2022 05:45 PM2022-09-30T17:45:50+5:302022-09-30T19:30:37+5:30

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे.

NCP leader Anand Paranjape has criticized the former mayor of Thane Municipal Corporation, Naresh Mhaske. | शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

Next

ठाणे- खासदार सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती वाढविण्याच्या गप्पा मारणाऱ्या नरेश म्हस्के यांनाच स्मृतीभ्रंश झालेला आहे. कारण, त्यांनी सन 2005 मध्ये नारायण राणेंसोबत जाताना  केलेली गद्दारी आणि आपल्याच पक्षाचे रवींद्र फाटक यांना 2014 मध्ये पराभूत करण्यासाठी केलेल्या कुरापती म्हस्के विसरले आहेत. त्यांना अल्झायमर झाला आहे. त्यामुळेच त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचारांची गरज आहे,  असा प्रतिटोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. 

सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती कमजोर झाली असून त्यांना टाॅनिक पाठवू, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती. त्याचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. परांजपे यांनी, म्हस्के यांचा उल्लेख फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते , असा उल्लेख करून सुप्रियाताई सुळे यांची स्मरणशक्ती किती दांडगी आहे, याचा पुरावा संसदेत जाऊन म्हस्के यांनी शोधावा. आपल्या 13 वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना आठवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावरच लोकांचे सर्वात जास्त प्रश्न संसदेत  मांडणाऱ्या,  सर्वात जास्त चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रियाताई या महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. त्यामुळेच सुप्रियाताई यांच्यावर टीका करणार्‍या नरेश म्हस्के यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला परांजपे यांनी हाणला. 

म्हस्के यांना विस्मृतीचा आजार म्हणजेच अल्झायमर झाला आहे, त्यामुळे मला म्हस्केंबद्दल सहानुभूती आहे.  सन 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत जाऊन म्हस्के यांनी गद्दारी केली होती. ही गद्दारी ते विसरत चालले आहेत. पण, त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच त्यांना क्षणभर विश्रांती या हाॅटेलातून परत आणले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हस्केंना पुन्हा शिवसेनेत घेतले होते.  त्यानंतर , सन 2014 च्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने म्हस्के हे रुसून घरात बसले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली असली तरी त्यांना जे करायचे होते तेच केले. अन् म्हस्केंनी  शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना पराभूत केले.   हा सर्व गद्दारीचा इतिहास ते विसरले आहेत. पण, ठाणेकर नागरिक त्यांचा हा इतिहास विसरलेले नाहीत. त्यामुळे म्हस्केंचा अल्झायमर बरा करण्यासाठी आता त्यांना टाॅनिकची नाही तर बड्या मानसोपचारतज्ज्ञाकडून वस्तूनिष्ठ उपचारांची गरज आहे. आपण मागेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विनंती करून एक बेड राखीव ठेवण्याची विनंती केली होती. आता पुन्हा एकदा हात जोडून बेड राखीव ठेवण्याची विनंती करतो, असे परांजपे म्हणाले. 

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपला नंबर लागावा,  यासाठीच ते शरद पवार, अजित पवार आणि सुप्रियाताई यांच्यावर बेछूट आरोप करीत आहेत. त्यांचा हा सूर्यावर थुंकण्याचा केविलवाना प्रयत्न  होत आहे. सुप्रियाताई योग्यच बोलल्या आहेत. हे सरकार पन्नास खोक्यांचे आहे. या सरकारचा मुंबई ते सुरत ते गुवाहाटी ते गोवा आणि नंतर शपथविधी हा प्रवास महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला माहित आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदारकीसाठीचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न पाहता, नरेश म्हस्के यांची तब्येत ठिक व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो, असेही परांजपे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: NCP leader Anand Paranjape has criticized the former mayor of Thane Municipal Corporation, Naresh Mhaske.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.