"टोमणे मारणं सोप्पं काम नाही, उद्धव ठाकरे यांचा टोमणे मारायचा स्वभाव मला आवडतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:36 PM2023-01-26T20:36:00+5:302023-01-26T20:36:31+5:30
एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते असं कौतुक आव्हाडांनी केले आहे.
ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी ठाकरे गटाकडून आयोजिक आरोग्य शिबिराचं त्यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हेदेखील होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव मला खूप आवडतो. उद्धव ठाकरेंबद्दल मला आपुलकी आहे. सहवासामुळे माणूस समजतो. त्या प्रेमापोटी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मानवी नाते मला महत्त्वाचं वाटतं. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पहिल्यापासून त्यांचा स्वभाव आवडतो. त्यांचे टोमणे मारणे, व्यंगात्मक बोलणे, एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते. टोमणे मारणे सोप्पे काम नाही. टोमणे मारताना त्यावेळेला कुठला टोमणा किंवा शब्द गेला पाहिजे हे लक्षात हवं. शब्दफेक ही कमालीची कला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडी होणार असं मला वाटते. पण ते वरिष्ठ नेते ठरवतील. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. सत्ता असो किंवा नसो आम्ही शरद पवारांबद्दल काहीही बोलले सहन करणार नाही. सत्ता ही फार महत्त्वाची आहे असे नाही. माझ्या ३५ वर्षातील आयुष्यात केवळ ३ वर्ष मंत्री होतो. ३२ वर्ष रस्त्यावरच गेली. त्यामुळे फरक काय पडतो. ज्या बापाला आपण बाप मानलाय त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन. एकटा असलो तरी विरोध करेन असं विधान जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर केले आहे.
टोमणे शब्दावरून भाजपा उद्धव ठाकरेंना डिवचतं
मविआ सरकार काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांच्याकडे असा बॉम्ब आहे जो कुणाकडेच नाही तो म्हणजे टोमणे बॉम्ब असा शब्दप्रयोग केला होता. तेव्हापासून विरोधकांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणात केवळ टोमणेच असतात दुसरं काहीही नसते अशी टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे टोमणे या शब्दावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचं काम भाजपाकडून वारंवार केले जाते.