Coronavirus: आरोग्यमंत्र्यांकडून घरात राहण्याचं आवाहन; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:57 PM2020-03-21T15:57:37+5:302020-03-21T15:58:39+5:30
Coronavirus: राज्यात कोरोनाचं सावट असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात
उल्हासनगर: देशात कोरोनामुळे सर्वत्र दहशत पाहायला मिळत असताना, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असताना उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे दररोज पत्रकार परिषद घेऊन गर्दी टाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन करत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षप्रवेशात गुंग असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
उल्हासनगरमध्ये कोरोनाचे सावट असताना राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयात शनिवारी दुपारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजपचे पदाधिकारी अमित वाधवा यांनी सहकाऱ्यांसमवेत शहराध्यक्ष हरकिरण कोर धामी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्याकडे राष्ट्रवादीनं शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या खास मर्जीतील व शहर सचिवपदी असणारे अमित वाधवा यांनी शनिवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे गटनेता भरत गंगोत्री यांच्या भाटिया चौकातील पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी 1 वाजता पार पडला. यावेळी शहराध्यक्ष हरकिरण कौर धामी, पक्षाचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष कौर धामी यांनी वाधवा यांचे स्वागत करून त्यांची शहर महासचिव पदी नियुक्त केल्याची माहिती दिली. वाधवांमुळे पक्षाची ताकद वाढल्याची माहिती कौर व गंगोत्री यांनी दिली असून राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर पक्षाचे काम एकनिष्ठतेने करणार असल्याचे वाधवा म्हणाले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासन नागरिकांत जनजागृती करून प्रसंगी कारवाई करत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाने पक्षप्रवेश कार्यक्रम घेतल्यानं शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कार्यक्रम ठिकाणी भेट दिल्याचे बोलले जात आहे. तर शहराध्यक्ष हरकिरण धामी व गटनेता भरत गंगोत्री यांनी निवडक 3 ते 4 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश दिल्याची प्रतिक्रिया दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव टळल्यानंतर पक्ष प्रवेशाचा जल्लोष करण्यात येणार असल्याचे गंगोत्री म्हणाले.