काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 09:58 AM2021-12-12T09:58:07+5:302021-12-12T09:58:34+5:30
पालिका, जि.प. निवडणुकीत सेनेसोबत आघाडीची तयारी.
ठाणे : जिल्ह्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे ९९ टक्के आघाडी करून लढतील, असा विश्वास व्यक्त करतानाच दोन्ही पक्षांतील काही विघ्नसंतोषी मंडळी महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत असल्याचा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आव्हाड यांनी नवी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे आव्हाड यांनी नामोल्लेख केला नसल्याने त्यांचा रोख कुणाकडे याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक शत्रू भाजप असल्याने त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे यावे लागले तरी चालेल. परंतु आघाडी करावीच लागेल, असे सांगून आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना तडजोडीला तयार राहण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते.
आव्हाड म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी आता फक्त ९० दिवस शिल्लक आहेत. आळस झटकून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे. भाजपने नोटबंदी, जीएसटी लागू करून लोकांचे आर्थिक नुकसान केले. इतरही चुकीच्या गोष्टी केल्या. त्याची माहिती प्रत्येक मतदाराला देण्याचे काम कार्यकर्त्याने करावे.
राज्यात महाविकास आघाडीचे काम योग्य पद्धतीने सुरू असून, शरद पवार यांच्यानंतर राज्यासाठी काम करणारा नेता कुणी असेल तर तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येत्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आघाडी होईल, असा विश्वास व्यक्त करून आव्हाड म्हणाले, कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तसेच वाटत असेल. आमच्यात काही गोष्टींवरून जरी वाद होत असले तरी ते तात्पुरते असल्याने आघाडी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी आरक्षण कोण रोखतंय..
ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा सुरू ठेवला असून, तो सुरूच राहणार आहे. राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोण जात आहेत हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला.
केवळ सोशल मीडियाने निवडणूक जिंकता येत नाही
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आव्हाड यांनी कान टोचले. केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदार नोंदणी, घराघरांत जाऊन संपर्क यावर भर द्यावाच लागेल. आपण नगरसेवक नाही, म्हणून वॉर्डातील कामे करण्याचे टाळू नका. निवडणुकीत पडलो म्हणून पुढील पाच वर्षे वॉर्डात कामच करायचे नाही, असे चालणार नाही, असे ते म्हणाले.
राऊतांनी घडवले माणुसकीचे दर्शन
शरद पवार यांना बसण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी स्वत: खुर्ची उचलून दिल्यावरून भाजपची मंडळी टीका करीत आहेत. परंतु वडीलधाऱ्या माणसाला मदत करून राऊत यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. मात्र भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना उभे राहण्यासाठीदेखील जागा दिली जात नाही, ही त्यांची संस्कृती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.