सबका साथ...सबका विकास...सबका प्रयास...!; राष्ट्रवादीनं मानले मोदींचे आभार! ठाण्यात पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:42 PM2021-09-06T13:42:39+5:302021-09-06T13:44:03+5:30
NCP Banner In Thane: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.
NCP Banner In Thane: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बॅनरबाजी केली आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास! अशा मथळ्याखाली ठाण्यात मुख्य रस्त्यांवर राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली असून यात २०१४ सालचे गॅस सिलिंडरचे दर आणि सध्याचे दर याची माहिती देण्यात आली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ केल्याबाबत उपरोधिकपणे टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींचे आभार या बॅनरमधून व्यक्त करण्यात आले आहेत. १ मार्च २०१४ रोजी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये होता. तर १ सप्टेंबर २०२१ रोजीचा दर ८८४ रुपये इतका झाला आहे. गॅस सिलिंडरच्या दराचा 'विकास' झाला त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार या बॅनरमधून व्यक्त करण्यात आले आहेत.
VIDEO: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाण्यात पंतप्रधान मोदींविरोधात ठिकठिकाणी बॅनरबाजी pic.twitter.com/DserPcOAVQ
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
"यूपीए सरकार होतं. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी १ एप्रिल २०१४ रोजी घरगुती गॅस सिलिंडरचा भाव हा ४१० रुपये होता. आता तोच सिलिंडर ८८४ रुपयांना मिळतोय. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका प्रयास बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी महागाईवर बोलत नाहीत. वाढलेल्या इंधन दरवाढीवर बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाहीत. लसीकरणाचा घोळ झाला त्यावर बोलत नाहीत. पंतप्रधानांना गरीबांचं काहीही पडलेलं नाही. म्हणूनच संपूर्ण ठाणे शहरात मोदींचे आभार व्यक्त करणारे पोस्टर आम्ही लावले आहेत. गणेशोत्वासाठीची गॅस दरवाढीची भेट पंतप्रधान मोदींनी जनतेला दिली आहे", अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे.