राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष लढविणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक
By जितेंद्र कालेकर | Published: June 7, 2024 03:34 PM2024-06-07T15:34:44+5:302024-06-07T15:35:05+5:30
Konkan Graduate Constituency Election 2024: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष देखील रिंगणात उतरला आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या पक्षाचे ठाण्यातील माजी नगरसेवक अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतांनाच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष देखील रिंगणात उतरला आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या पक्षाचे ठाण्यातील माजी नगरसेवक अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतांनाच त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे सरैय्या यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे.
शुक्रवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी सरैया यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेली सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनसेच्या माघारीबाबत ते म्हणाले, मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटींग करणारा पक्ष अशी मनसेची ओळख असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमीत सरैया म्हणून काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महेंद्र पवार, प्रियांका सोनार, सचिन पंधेरे आदी उपस्थित होते.