राष्ट्रवादी-शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात , भाजपाने कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:29 AM2017-10-04T01:29:08+5:302017-10-04T01:29:33+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही.
मुरबाड :जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरीकडे बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली तरी बेहत्तर; परंतु, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हात मिळवणी करून सेवा सोसायट्यांच्या जोरावर निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यावेळीच राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र आणि टीडीसीचे संचालक सुभाष पवार हे शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. ते पक्षांतर करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण तसे न घडल्याने राष्ट्रवादी सध्या तटस्थ आहे. राष्ट्रवादी १२५ ग्रामपंचायतींवर दावा करत असली; तरी त्यांना एकही ग्रामपंचायत पदरात पाडून घेता आली नाही. तरीही शिवसेनेसोबत जात त्यांनी बाजार समितीवर सत्ता आणली.
या निवडणुकीत शिवसेनेने कोणत्या समविचारी पक्षासोबत युती करावी, की स्वबळावर लढावे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि त्यानुसार कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडतील.
- कांतीलाल कंट,
तालुकाप्रमुख, मुरबाड
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाला शह देण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिवसेनेत प्रवेश न करता राष्ट्रवादीत राहूनच शिवसेना, काँग्रेस या समविचारी पक्षांसोबत युती करु न आम्ही लढणार आहोत.
- सुभाष पवार, टीडीसी संचालक व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते.
महापोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य
अनगाव : भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महापोली गट आणि महापोली, अनगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस, मनसे, कुणबी सेना यांच्यासोबत आघाडी असल्याने भाजपाचे लक्ष या गटाकडे लागले आहे. पूर्वीचा गणेशपुरी गट व आता नव्याने महापोली गट निर्माण झाला आहे. या गटात शिवसेना- भाजपाची युती असतानाही राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी जाहीर केले. खासदार कपिल पाटील यांनी येथे भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या गटात चौदा हजार मतदार आहेत. महापोलीत ३२०० मतदार आहेत तर अनगावमध्ये दोन हजार मतदार आहे. तेथे आघाडीचे प्राबल्य जरी असले तरी त्याला सुरूंग लावण्यात खासदारांना यश आले.