महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार, राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 09:10 PM2021-12-29T21:10:36+5:302021-12-29T21:15:01+5:30
राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्लांचा दावा: पालिकेत महाविकास आघाडी संबोधू नका
ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणूकीत आघाडी होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले आहे. तसेच पालिका निवडणुकीत विरोधातच लढण्याचा दावाही त्यांनी केला. आम्हाला महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून संबोधू नका, असेही त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना स्पष्ट केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे पालिकेने राज्य निवडणुक आयोगाकडे कच्ची प्रारुप प्रभाग रचना सादर केली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीत लढण्याचे संकेत देत त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांची एक समिती तयार केली. या दोन्ही नेत्यांची महाविकास आघाडी करण्यासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे. एकीकडे असे असतानाच राष्ट्रवादीचे गटनेते मुल्ला यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीबाबत महत्वपूर्ण भाष्य केले. ठाण्यात आजपासून महाविकास आघाडी नसेल तसेच यापुढे पालिका निवडणुकीतही आघाडी होणार नाही, असे सांगत त्यांनी पालिका निवडणुकीत आम्ही विरोधातच लढणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेत आम्हाला महाविकास आघाडी म्हणून संबोधित करू नका, असे त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना सांगितले. आता मुल्ला यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये खुशीचे वातावरण होते. तर आघाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.