राष्ट्रवादी महिला काँग्रेसने ठाण्यात जाळली ईव्हीएम आणि मनुस्मृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:45 PM2018-12-02T22:45:27+5:302018-12-02T22:53:32+5:30
राष्ट्रवादी काँग्रेससह १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. निवडणूक आयोग मात्र ती मान्य करायला तयार नाही. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी ठाण्यात केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मतदानाच्या ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करूनच भाजप सत्तेमध्ये येत आहे. जिथे इव्हीमचे घोटाळे तिथेच भाजपाची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. निवडणूक आयोग मात्र ती मान्य करायला तयार नाही. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी ठाण्यात केला. खान यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ईव्हीएम आणि मनुस्मृतीच्या प्रतींचे दहन केले.
येत्या ५ डिसेंबर रोजी रोहा येथे संविधान बचाओ परिषद आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी कळवा येथे राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना फौजिया खान यांनी हा आरोप केला. यावेळी आमदार विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, राजश्री भोसले, ऋता आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
खान म्हणाल्या की, या देशामध्ये आराजकता माजली आहे. कितीही मोर्चा-आंदोलने केली, तरी हे सरकार कोणाचेही ऐकत नाही. मराठा समाजापुढे हे सरकार झुकले असले तरी सबका साथ, सबका विकास असे म्हणणारे मोदी-फडणवीस हे धनगर आणि मुस्लीम समाजावर अन्याय करीत आहेत. संविधानाने समताधिष्ठीत व्यवस्था लागू केली आहे. तरीही आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार दोन समाजांवर अन्याय करीत आहे. या सरकारला हिंदुत्वाच्या नावाखाली मनुवादी व्यवस्था आणायची आहे. दोन धर्मियांमध्ये दंगे घडवायचे आहेत, असाही आरोप त्यांनी केला. हुकूमशाही लादून संविधान संपवायचे आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. ज्या मनुस्मृतीने येथे वर्णव्यवस्था लादली होती, ती मनुस्मृती दूर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे राज्य आणले होते. मात्र आताच्या सरकारला हे राज्य नको आहे. मंदिर- मस्जिद आणि शहरांची नावे बदलवून मूळ विकासाचे मुद्दे बाजूला सारत आहेत. त्यामुळे आता हे सरकार बदलण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपण नोकरी, आरोग्य , शिक्षण याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी महिलांनी आक्रमक होण्याची गरज आहे, असेही त्यांनी आवाहन केले.
आमदार विद्या चव्हाण यांनीं, देवेंद्र -नरेंद्र यांच्यामुळे या देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला. जंतर मंतरवर संविधान जाळण्यापर्यंत लोकांची मजल जाते .हे सरकार त्यांना अभय देत आहे. संविधानामुळे या देशातील महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पण हे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. सनातन, आर एस एस आणि भाजप यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. हे लोक अधिवेशन सोडून अयोध्येत मंदिर बांधायला जात आहेत. पण, आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्टÑवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि ऋता आव्हाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास नगरसेविका राधाबाई जाधवर, वहिदा खान, अंकिता शिंदे, वनिता घोगरे, अपर्णा साळवी, प्रमिला केणी, वर्षा मोरे, आरती गायकवाड, आशरीन राऊत, अनिता किणे, फरजाना शेख, सुनिता सातपुते, मनाली पाटील, सुजाता घाग, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षा रिनी रजिवी, शहर उपाध्यक्ष वंदना जाधव, महिला पदाधिकारी मेहरबानो पटेल यांच्यासह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.
दरम्यान, हा मेळावा संपल्यानंतर महिलांनी सत्ताधा-यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत ईव्हीएमच्या प्रतिकांचे आणि मनुस्मृतीच्या प्रतींचे दहन केले.